काँग्रेसने पुढे येणाऱ्या नेत्यांना गायब करण्याचं काम केल्याचा उदयनराजेंचा गंभीर आरोप
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान कॉंग्रेसने यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा केवळ वापर करत त्यांचे विचार अंगीकारले नाही.पुढे येऊ पाहणाऱ्या माणसांना गायब करण्याचे काम काँग्रेसने केले असा गंभीर आरोप महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केला.
जलमंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते पुढे म्हणाले,महाराष्ट्राच्या मातीत अनेक चळवळी उदयास आल्या, त्यामध्ये स्त्री शिक्षण, सत्यशोधक समाज, प्रतिसरकार यांचे मोठे योगदान देशाच्या उभारणीच झाले. कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी देखील देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. परकीय आक्रमणाच्या काळात त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रीपद भूषवले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे त्यामुळेच म्हटले जाते. यशवंत विचार हा लोककल्याणाचा विचार आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला पण त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत. एवढे मोठे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेले तरी देखील काँग्रेसला भारतरत्न पुरस्कार देण्याची सुचले नाही.काँग्रेसला ‘आऊट ऑफ साईट, आऊट ऑफ माईंड’ हे सूत्र लागू होतं.
यशवंतरावांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे कर्तव्य आम्ही पार पडणार आहोत. काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला, त्यांनाही यशवंतरावंना भारतरत्न द्यावा असे वाटले नाही. कॉंग्रेसने यशवंतरावांनंतर त्यांच्या विचारांना तिलांजली दिली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत जाहीर सभा होणार आहे.या सभेतच यशवंतरावांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणार आहे, असे उदयनराजे म्हणाले.
काँग्रेसने पुढे येणाऱ्या नेत्यांना गायब करण्याचं काम केलं
यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र लिहिलं होते. त्यामध्ये पहिले कृष्णाकाठ हे प्रसिध्द झाले. त्यानंतर त्याचा दुसरा भाग असलेले सागरतटी आणि यमुनातिरी हे मुंबई आणि दिल्लीतील राजकारण याबद्दल त्यामध्ये लिहिलं होतं. हे लिखित साहित्य काही राजकीय मंडळीनी त्यांना अडचण होईल म्हणून गायब केले होते. त्यानंतर काही लोकांनी ते लिखित साहित्य कोणी गायब केलं त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. त्यानंतर काहीच झालं नाही. याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून आहे. पुरावे सोडून द्या, लोकंच गायब करण्याची परंपरा आहे. काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढं जात असेल तो गायब होतो,याला योगायोग म्हणता येत नाही.
काँगेस नेते राजेश पायलट यांचा अखिल भारतीय काँग्रेसचा अर्ज भरायला जात असताना अपघात झाला. त्यानंतर माधवराव सिंधिया, वाय.एस. आर. रेड्डी अशा काँग्रेसमधील पुढं येणाऱ्या मोठ्या नेत्यांचे अपघाती निधन होते. ही मालिका म्हणजे विचार करायला लावणारी आहे. अशी कित्येक नेतृत्व काँग्रेसने गायब केली असून ती परत कधीच दिसली नाहीत.त्याबाबतचे कोणते पुरावेही सापडलेले नाहीत. असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला.
You must be logged in to post a comment.