सुशांत मोरे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार : राजू भोसले

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सुशांत मोरे यांनी केलेले आरोप कुणाच्यातरी सांगण्यावरुन केलेले आहेत. त्यांच्या आरोपामध्ये तथ्य नाही. त्यांनी केलेले तक्रार अर्ज यापूर्वीच तहसीलदारांनी फेटाळले असून त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. तसेच त्यांच्याविरोधात कायदेशीर लढाई करण्यासाठी मी तयार असल्याची माहिती माजी जि.प. सदस्य राजूभैय्या भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

पत्रकात पुढे नमूद केले आहे की, आमचे फॉर्महाऊस हे रितसर परवानग्या घेऊन बांधण्यात आलेले आहे. २०१६ मध्ये तत्कालीन सातारा तहसीलदारांनी फार्म हाऊस बांधण्याकरता परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे २०२१ मध्ये सात-बारा उताऱ्यावर नोंद करण्याबाबत अर्ज केला होता. त्यानंतर २०२२ मध्ये सातबारा उता-यावर फॉर्म हाऊस बांधल्याची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे २०२२ मध्ये तत्कालीन तहसीलदारांनी याप्रकरणी दहिवड मंडलाधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन बांधकामाची नोंद सातबारा उताऱ्याला करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय सादर केला आहे. सगळे बांधकाम आणि परवानगी कायदेशीर असतानाही राजकीय आकसापोटी काही विरोधक सतत माझ्याविरोधात कारवाया करत असतात. अतिशय कष्टातून मी प्रगती केलेली आहे.

मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानत परळी भागात काम करत आहे. या भागात माझे वर्चस्व वाढत असल्यामुळे मला बदनाम करण्याच्या हेतूने समाजातील माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी सतत काही ना काही कुरघोड्या सुरु असतात, मात्र अशा कुरघोड्यांना मी घाबरत नाही. सुशांत मोरे यांनी अनाधिकृत बांधकाम असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. तहसीलदारांनी दहिवड मंडलाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्यास सांगितली होती. त्यांनी चौकशी केली असता आष्टे येथील आशा राजू भोसले यांनी रहिवास व वाणिज्य कारणास्तव बिनशेती परवानगी मिळण्याबाबत मागणी केली होती. त्यांना तत्कालीन नगररचनाकार यांनी अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. याठिकाणी बांधकामासाठी सपाटीकरण केलेले आहे. तसेच बांधकामास उरमोडी धरण व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची नाहरकत आणि परवानगी आदेश प्राप्त केले आहेत. तसेच गट नं. ४० हा शेती वापरात असून गट नं. ३९ हा उरमोडी धरणाच्या उत्तरेलगत असून त्यामध्ये अंदाजे ६० बाय ६० फूट शेतघर बांधकाम केलेले आहे. त्यासाठी संबधित कार्यालयाकडून पूर्वपरवानगी घेऊन त्याची नोंदही केलेली आहे, असा अभिप्राय दिल्याने तहसीलादरांनी सुशांत मोरे यांचा अर्ज निकाली काढला आहे. तसेच याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे सादर केली आहे.

सुशांत मोरे यांचा अर्ज निकाली निघाली असल्याने आता कुठेच काही होत नाही हे पाहून बदनामी करण्याच्या हेतूने त्यांनी नोटीस पाठवलेली आहे.परंतु याप्रकरणात कायद्याचे उल्लंघन करुन कोणतीही कृती केलेली नाही, त्यामुळे कायदेशीर लढाईमध्ये माझाच विजय होईल, याची मला खात्री आहे असेही माजी जि.प.सदस्य राजू भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!