आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
वाई,(भूमिशिल्प वृत्तसेवा): गेल्या दहा वर्षांमध्ये स्थिर सरकार असल्यामुळे जिल्ह्यात वेगाने विकासकामे मार्गी लागली. आता या लोकसभा निवडणुकीत देखील मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. केंद्रातील सर्व योजना वाई मतदार संघात राबवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले.
वाई येथे वाई शहर, यशवंत नगर, शहाबाग येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मकरंद पाटील, तीर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, किसन वीर साखर कारखान्याचे संचालक शिवाजी जमदाडे, भाजप महिला मोर्चाच्या मुंबई उपाध्यक्ष वर्षाताई भोसले, वाईचे माजी सभापती विजयसिंह नायकवडी, माजी नगरसेवक मन्नात जमादार, डॉ. अमर जमदाडे ,बाळू चिरगुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून वाई ,खंडाळा, महाबळेश्वर या तिन्ही तालुक्यातील लोकांना अपेक्षित असे कार्य करू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून करोडो रुपयांची विकास कामे मतदार संघात झाली. मकरंद आबांनी सुरूर, पोलादपूर येथे हबचा प्रस्ताव दिलेला आहे. आबा आणि माझे व्हिजन एकच आहे, असे ही उदयनराजे म्हणाले.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, उदयनराजे वाई मतदार संघामध्ये सव्वा लाखांपेक्षा जास्त लीड मिळवण्याचे नियोजन आपण केलेले आहे. वाई शहर, यशवंत नगर शहाबाग या परिसरामध्ये ४५ हजारांच्या आसपास मतदान आहे, हे सर्व मतदान कमळाला पडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. उदयनराजे यांना निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
महायुतीच्या माध्यमातून वाई शहरात मोठे प्रकल्प उभे राहिले, त्यातील शहरातील पुलाचे काम उल्लेखनीय आहे. जल शुद्धीकरण प्रकल्पासाठी २२ कोटी ५० लाख मंजूर झालेले आहेत ६२ कोटी रुपये पिण्याच्या पाण्याची योजनेसाठी मंजूर झाले आहेत. कृष्णा डॅम मधून वाई शहरांमध्ये पाणी आणण्यात येणार आहे. वाई शहरात दुसरा पूलही बांधण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे तरी ज्यांनी आपल्याला भरघोस दिले त्यांना मतांच्या रूपाने देण्याची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या विजयासाठी आतापासून कामाला लागावे असे आवाहन मकरंद आबा पाटील यांनी केले.
You must be logged in to post a comment.