सातारा(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा रुग्णालयास लवकरच अचानक भेट देवून पाहणी करेन.या रुग्णालयाचा टप्प्या-टप्प्याने विकास करण्याच्या अनुषंगाने आरोग्य उपसंचालकांसमवेत व्यापक बैठक घेवून जे-जे करावे लागेल, ते करू. सातारा जिल्हयातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
मुंबईत आझाद मैदानावर नियोजित शिवसेनेच्या (शिंदे गट) दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी सातारा दौऱ्यावर आलेल्या राजेश क्षीरसागर यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, हरिदास जगदाळे आदी उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, दरवर्षी दसऱ्याला शिवतिर्थावर शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी जायचो. गेल्यावर्षी शिवसेनाप्रमुखांचे विचार आम्ही एकनाथ शिंदे यांच्या तोंडून ऐकण्यासाठी बी.के.सी. मैदानावर गेलो तर यावर्षी शिवसैनिकांचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होत आहे. सातारा जिल्ह्यातून किमान दहा हजार शिवसैनिक मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर राज्यभरातून लाखो शिवसैनिक उपस्थित राहतील.
मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय गंभीर आहे. आरक्षण मिळावे, पण कायमचे टिकणारे असावे, यासाठी सरकार काम करत असून मराठा समाजाला आरक्षण एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारींबाबत क्षीरसागर म्हणाले, असे प्रकार आढळून आल्यास ताबडतोब तक्रार करावी. सर्वसामान्यांना त्रास झाल्यास कडक कारवाई करणार करणार असल्याचे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत युतीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यानंतरच सातारची जागा युतीतील कोणत्या पक्षाचा उमेदवार लढवणार हे निश्चित होईल.कोल्हापुरातील एका कार्यक्रमात एकमेकांचे विरोधक असलेले सतेज पाटील, धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येवून फेटे बांधले याबाबत क्षीरसागर यांना छेडले असता ते म्हणाले, राजकारणात कोणी हाडवैर संपवून एकत्र येत असले तर आनंदच आहे. परंतु, ते तिघे एकत्र आले तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही. उलट शिवेसनेचाच जनाधार वाढेल. कारण जनतेलाही त्यांचे खरे राजकारण कळून येईल.
You must be logged in to post a comment.