पाऊस कोसळतानाही साताऱ्याचा पाणी प्रश्न पेटणार?

लोकप्रतिनिधींची उदासीनता की प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): गेले पाच सहा दिवस सातारा शहरातील काही उपनगरे व मुख्य शहराच्या पेठांमधील काही परिसरात पाण्याचा ठणठणाट झाल्याने नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. दोन सक्षम लोकप्रतिनिधी असताना सातारकरांना पाण्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या या यातना कधी संपणार? असा संतप्त सवाल उपस्थित होत असून ही परिस्थिती अशीच राहिली तर सातत्याने पाऊस कोसळत असतानाही साताऱ्याचा पाणी प्रश्न पेटणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

सातारा शहराला मुबलक पाणी पुरवठ्याचे स्त्रोत उपलब्ध असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येणे हे नवीन नाही. एकीकडे कृष्णा नदी, दुसरीकडे उरमोडीचा उ‌द्भव, तिसरीकडे ऐतिहासिक कास तलाव असा तिन्ही बाजूने भक्कम पाण्याचा स्त्रोत असलेले सातारा हे एकमेव शहर असावे. असे असले तरी प्रत्येक वर्षी सातत्याने किमान कोणत्या ना कोणत्या भागात पाण्याची ओरड सुरुच असते.

सातारा शहर वसवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या काळात आणि त्यानंतर या शहराचे एखाद्या पाश्चिमात्य देशातील शहराच्या धर्तीवर आखणी करणाऱ्या छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या कारकिर्दीतही त्यांनी पाणी या मूलभूत नागरी गरजेकडे अत्यंत दूरदर्शीपणे लक्ष दिले होते. कास तलावातून आणलेल्या खापरी पाईप लाईनचे पाणी शहरातील पेठेत बांधलेल्या हौदावाटे लोकांना पुरवले जात होते. कोणतीही आधुनिक सुविधा नसताना नैसर्गिक चढउताराचा कल्पकतेने वापर करून ही योजना अत्यंत सुलभतेने वापरात होती. आज मात्र याच्या अगदी उलट सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असताना असलेल्या भरपूर पाणी साठ्याचे योग्य वितरण करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार याला कारणीभूत आहे. काही महिन्यांपूर्वी गुरुवार बागेतील मुख्य व्हॉल्व फुटल्याने लाखो लिटर पाणी अवघ्या काही तासात वाया गेले होते. ते केवळ आणि केवळ पालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळेच.

सध्या साताऱ्यातील गोडोली, गोळीबार मैदान, सदरबझार, शाहुपुरी,आकाशवाणी परिसर,शाहूनगरसह शहरातील प्रतापगंज पेठेच्या काही भागात पाण्याचा ठणठणाट झाल्याने नागरिक वैतागले आहेत. सलग पाच दिवस पाणी पुरवठा न झाल्याने अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. पाण्याची ही परिस्थिती अशीच राहिल्यास सातारा नगरपालिका, जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषास सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा पाणीप्रश्न पेटण्याआधी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावर ठोस उपाय योजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

error: Content is protected !!