सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): महिलांनो तुम्ही कमकुवत नाही आत्मनिर्भर व्हा, तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिले तर त्याला धडा शिकवा,महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या पाठीशी राहिल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे ऑनलाईन उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. येथील अलंकार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (ऑनलाईन), पोलीस महासंचालक संजय पांडे (ऑनलाईन), विशेष पोलीस महासंचालक ( महिला व बाल ) राज वर्धन (ऑनलाईन), जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, महिलांनी आत्मनिरभर झाले पाहिजे, मला कोणाचीही गरज नाही असा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. कुणी तुमच्यावर वाईट नजर टाकली तर त्याला धडा शिकवला पाहिजे तुमचे अनुकरण संपूर्ण देशाने केले पाहिजे, महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या पाठीशी राहिल. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हा महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.
पोलीसाबद्दल तळमळ, आपुलकी, आस्था आहे. पोलीस 18 तास काम करतात. ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता जनतेचे रक्षण करतात. गेली दिड वर्ष कोरोनाशी आपण लढत आहोत. या लढाईत अनेक पोलीस बाधित झाले, काहींचा दुर्दैवी मृत्यु झाला. महाराष्ट्र पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी काम करीत आहे. सातारा पोलीस दलाने महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पास विविध समाज माध्यमांचा वापर करुन आधुनिकतेशी सांगड घातली आहे. या प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.
प्रास्ताविकात गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, पोलीस विभागातील ज्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना ज्युडो कराटे येतात, अशा कर्मचाऱ्यांकडून शाळा, महाविद्यालयातील मुलींना स्वत:ची सुरक्षा कशी करता येईल यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सुरु आहेत. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे छेडछाडी, अपवृत्तींना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. याचबरोबर चार्जशिट वेळेत दाखल करणे, गुन्हा नोंदविणे, तपासणीला गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे अपप्रवृत्तींना धाक बसणार असून गुन्ह्यांचेही प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचे चांगले परिणाम दिसल्यास हा प्रकल्प राज्यात राबवू, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.
या प्रकल्पाचे सादरीकरण उपविभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे केले तर सर्वांचे आभार प्रदर्शन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मानले
या कार्यक्रमास विविध संस्थाच्या महिला पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या
You must be logged in to post a comment.