सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा पालिकेत सत्ताधारी सातारा विकास आघाडीने शहरासह विस्तारित भागावर जास्त लक्ष पुरविले आहे. येणाऱ्या पालिका सभेत विस्तारित भागात पालिकेने सुमारे दोन कोटीहून अधिक खर्चाचे ४४ विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. या विषयांच्या मंजुरीनंतर या भागातील रखडलेल्या कामांसह नवीन कामे मार्गी लागणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे दिली.
याबाबतच्या निवेदनात उदयनराजे यांनी पालिका सभेपुढे घेण्यात येणाऱ्या विषयांची माहिती दिली. यात शाहूपुरी, विलासपूर, दरे खुर्द, पिरवाडी, शाहूनगर, गोळीबार मैदान, विसावा नाका आदी भागातील नागरिकांनी पालिकेकडे विविध विकासकामे पूर्ण करण्याची मागणी केली होती. लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेत त्यासाठीचा आराखडा, प्रस्ताव तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. तयार झालेले आराखडे, प्रस्ताव नंतरच्या काळात स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात येणार आहेत. यानंतर हे विषय सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणार आहेत.
सातारा शहरासह विस्तारित भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, यासाठीचे हे विषय प्राधान्याने तयार करण्यात आले असून, यामुळे त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. या कामांसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध असून, सातारकरांना अभिप्रेत असणारा विकास सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून सातारा पालिका करीत असल्याचेही उदयनराजे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे प्रशासकीय कामकाज थंडावल्याने पालिकेचे उत्पन्न कमी झाले आहे, असे असतानाही नागरिकांच्या हितास प्राधान्य देण्यासाठी पालिकेने नागरी समस्या सोडविण्यावर भर दिला आहे. गेली दीड वर्षे कोरोनाच्या हाहाकाराने संपूर्ण जग ग्रासले आहे. त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या कालखंडामध्ये शासकीय निधी, करवसुली याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला, तरी सुद्धा सातारा नगरपालिकेने नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत नागरिकांच्या गरजा सोडविण्यावर भर दिला आहे.
होणाऱ्या सभेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना अभिप्रेत असणारी विकासकामे मंजुरीसाठी ठेवण्यात येत आहेत. या कामांमध्ये बागा विकसन, अतिथीगृह बांधणे, रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, गटार योजना, दिवाबत्ती, बसथांबे विकसन, स्वागत कमानी उभारणे, पूल, संरक्षक कठडे बांधण्यासह इतर ४४ विषयांचा समावेश असून, त्यासाठी सुमारे दोन कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याचेही उदयनराजे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
You must be logged in to post a comment.