ऐतिहासिक काळातील बांधकामाप्रमाणे शिवतीर्थचे काम करा : ना.शंभूराज देसाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा शहरातील पोवई नाका येथील शिवतीर्थचे काम करताना ते ऐतिहासिक दिसेल याप्रमाणे करावे अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी सातारा शहरातील शिवतीर्थ तसेच हुतात्मा स्मारक व विश्रामगृहाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी उपस्थित होते.

     शिवतीर्थच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, या कामासाठी वापरण्यात येणारा दगड चांगल्या प्रतीचा असावा. किल्ल्यांवर पूर्वी ज्या प्रमाणे बांधकामे असतं तसेच काम शिवतीर्थचे व्हावे. त्याठिकाणी आता फारशी बसवलेली आहे. ती काढून इतर कामाच्या ठिकाणी वापरण्यासाठी काय करता येईल त्याचे नियोजन करावे. पूर्ण काम दर्जेदार आणि शहरास शोभेल असे सुंदर व्हावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हुतात्मा स्मारकाचे काम आदर्श करावे

यावेळी पालकमंत्री श्री देसाई यांनी हुतात्मा स्मारकाच्या कमाचीही पाहणी केली. यावेळी युद्ध स्मरकासारखे हुतात्मा स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाचे काम आदर्श असे करावे. या ठिकाणी बगीचा तयार करावा. तसेच असलेल्या संपूर्ण जागेचा चांगला वापर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
या हुतात्मा स्मारकामध्ये दुसऱ्या महायुद्धापासूनच्या  शहीद जवानांची नावे कोरण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, निम लष्करी दलामधील शहीद जवान व अधिकारी यांची नावे कोरण्यात येणार आहेत. एक आदर्श युद्ध स्मारक उभे राहणार आहे.

शासकीय विश्रामगृहांच्या देखभालीसाठी जिल्हास्तरीय यंत्रणा उभारणार

पालकमंत्री श्री. देसाई यांनी नवीन शासकीय विश्रामगृहाच्या कामाचीही पहाणी केली. यावेळी विश्रामगृहाचे काम चांगल्या दर्जाचे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच जिलह्यातील सर्वच विश्रामगृहांच्या देखभालीसाठी जिल्हास्तरीय यंत्रणा उभारणार, या विश्रामगृहांचे नियंत्रण निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सोपाविणार, कराडचे नवीन विश्रामगृह अजुनही वापरात आलेले नाही. याचे कारण अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून निर्माण होणाऱ्या या शासकीय विश्रामगृहांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होते. तो सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता तसेच इतर संबंधित अधिकारी यांनी जिल्हास्तरीय यंत्रणा निर्माण करावी. या विश्रामगृहांचे परिचलन शासकीय अधिकाऱ्यांकडेच ठेवावे. खासगी संस्थेस चालविण्यास देवू नये अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

error: Content is protected !!