…यहां पे सब , शांती शांती है !


लॉकडाऊनचा पहिला दिवसाला सातारकरांचा ’कडक’ प्रतिसाद

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात लॉकडाऊनचा आज शुक्रवार पहिला दिवस सातारकरांकडून एकदम कडक पाळला गेला. नागरिकांनी आज केलेले सहकार्य असेच पुढील नऊ दिवस केले तर कोरोनाची साखळी तुटायला वेळ लागणार नाही. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात विनामास्क आणि विनाकारण फिरणार्‍या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात आली.


जिल्ह्यात पाळला गेलेला लॉकडाऊनचा पहिला दिवस शांततेत पार पडला असे म्हणायला हरकत नाही. नेहमीचे गजबजणारे रस्ते, चौक, बाजारपेठांमध्ये आज सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या व्यक्ती आणि त्यांची वाहने वगळता रस्त्यांवर फिरताना फारसं कुणी दिसत नव्हतं.
चौकाचौकात आणि महत्त्वाच्या नाक्यांवर पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत होती. मास्कविना तसेच विनाकारण फिरणार्‍या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्याचंही काही ठिकाणी पाहायला मिळालं. सातारा शहरात 179 वाहनांवर कारवाई करुन 47600 रुपये इतका दंड वसुल करण्यात आला. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सातारकरांनी जसे नियमांचे पालन केले तसे पुढील नऊ दिवस केल्यास हा लॉकडाऊन यशस्वी होऊन कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, हे नक्की !

सातारकरांचे सहकार्य आवश्यक : जिल्हाधिकारी
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील नियमांचे पालन करून सातारकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

’लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिस सज्ज’
जिल्ह्यात लागू झालेल्या लॉकडाऊन काळात नियमभंग करणार्‍यांविरुद्ध पोलिस यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी घरात सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
error: Content is protected !!