सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटी पध्दत बंद करून ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकर्या दिल्या जाव्यात, अन्यथा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या विविध समाजघटकांच्या संघटनांनाबरोबर घेऊन राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, प्रसंगी उच्च न्यायालयापर्यंत जावू, अशी कणखर भूमिका राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आज याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्याव्यात असा शासन निर्णय असताना त्याची कोठेहीअंमलबजावणी केली जात नाही. स्थानिक ठेकेदारांना हाताशी धरून कंत्राटी पध्दतीने अल्प मोबदल्यात कामगारांची भरती करून कंपन्या त्यांचे काम करून घेतात. राजकारणी मंडळीही अशा ठेकेदारांचा वापर निवडणुकांच्या राजकारणासाठी करतात. यामध्ये कामगार भरडले जातात. त्यामुळे हा विषय स्फोटक असल्याचे यशवंत भोसले यावेळी म्हणाले.
You must be logged in to post a comment.