सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): गरीब गरजू विद्यार्थ्यांना अध्यापन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्याख्यानातून शैक्षणिक प्रबोधन, सातत्याने शैक्षणिक लेखन इत्यादी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी येथील सुर्वे करियर अकॅडमीच्या वतीने कवी, लेखक ,वक्ते आणि कोरेगाव पंचायत समितीतील सांख्यिकी विस्ताराधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांचा शिक्षणाधिकारी अरुणा भुजबळ तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पालक, विद्यार्थी ,शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक श्री सुर्वे यांनी प्रास्ताविक केले.
या विशेष सत्कारबद्दल ते म्हणाले की, “श्री. क्षीरसागर हे सरकारी नोकरी संभाळत शैक्षणिक योगदान गेली अनेक वर्षे करीत आहेत. शेकडो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. व्यक्तिमत्व विकास, समाज आणि विद्यार्थी या विषयावर ते सातत्याने व्याख्याने देऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतात. मनातली वादळे, भारतीय संस्कृती ही त्यांची कवितेची पुस्तके विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहेत. “भारतीय संस्कृती” या कवितेने लिमका बुकमध्ये विक्रम केला आहे. तसेच सलग पंचवीस तास अध्यापन करण्याचा त्यांनी विश्वविक्रम केला असून या विक्रमाची नोंद “गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस”मध्ये घेण्यात आली आहे. त्यांचे हे दोन्ही उपक्रम अथवा विक्रम हे शैक्षणिक आहेत, हे महत्त्वाचे आहे. तसेच त्यांनी अनेक वर्तमानपत्रात लेख लिहून प्रबोधन केले आहे. या लेखांचा संग्रह पुस्तक रुपाने लवकरच प्रकाशित होत आहे. विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात त्यांचा पुढाकार असतो .गरिबांना मोफत मार्गदर्शन करण्याचा त्यांचा उपक्रम अत्यंत अनुकरणीय आहे.” प्रभाकर सामान्यज्ञान दिनदर्शिका” या नावाने त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खास जनरल नॉलेज चे कॅलेंडर निर्माण केले आहे. या दिनदर्शिकेमध्ये केवळ सामान्यज्ञान आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच वेगळा आणि शैक्षणिक उपक्रम आहे. या सर्व कार्याबद्दल त्यांचा हा विशेष सत्कार करण्यात येत आहे.
यावेळी शिक्षण अधिकारी अरुणा भुजबळ आणि नितीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी श्री. क्षीरसागर यांच्या कार्याचे कौतुक करताना सरकारी नोकरी सांभाळत वेळ मिळेल तेव्हा; आवर्जून शैक्षणिक कार्य करणे हे योगदान खूप महत्त्वाचे आहे. आज शिक्षण, प्रबोधन खूप महत्त्वाचे आहे . त्यांचीही उपक्रमशीलता खूप समाजाभिमुख आहे असे प्रतिपादन केले.
You must be logged in to post a comment.