सासनकाठीला विजेचा शॉक बसल्याने युवकाचा मृत्यू

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : भोसे ता. कोरेगाव येथे ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेनिमित्त ग्राम प्रदक्षिणेसाठी मंगळवारी निघालेल्या पालखी दरम्यान देवाच्या सासनकाठीला महावितरण कंपनीच्या ११ के.व्ही. क्षमतेच्या वीज वहिनीचा शॉक बसल्याने काठीचे मानकरी महेश बाळासाहेब माने वय २८ यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली.

भोसे गावातील ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम गेले दोन दिवस सुरू आहेत. मंगळवारी देवाची पालखी व मानाची सासनकाठीची ग्राम प्रदक्षिणा होती.मानाच्या सासन काठीचे मानकरी महेश बाळासाहेब माने यांनी यावर्षी काठी आकर्षकरित्या सजवलेली होती. त्याचबरोबर त्यास विजेच्या माळा देखील लावल्या होत्या, सकाळी ग्राम प्रदक्षिणा सुरुवात झाली, त्या दरम्यान महावितरण कंपनीच्या ११ के. व्ही. क्षमतेच्या वीज वाहिनीला काठीचा धक्का बसल्याने वीज प्रवाह काठीत उतरला आणि महेश माने यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. यात्रेमध्ये मानाच्या काठीच्या मानकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!