दिल्लीत ९ डिसेंबरला होणार गौरव सोहळा

कराड, (भूमिशिल्प वृत्तसेवा): कराड येथील वरिष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार आणि कराड वार्ताचे संपादक अस्लम मुल्ला यांना दिल्लीच्या कालीरमन फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणारा ‘भारत गौरव’ हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवार, दि. ९ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात मुल्ला यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अस्लम मुल्ला हे गेली २२ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध नामांकित दैनिकांमध्ये छायाचित्रकार म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचे प्रभावी चित्रण करणे ही त्यांची खास शैली ठरली आहे. समाजातील घडामोडींचे सत्यदर्शी चित्र त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून सातत्याने साकारले असून, अनेक राष्ट्रीय न्यूज चॅनेल्ससाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
मूळचे रेठरे खुर्द (ता. कराड) येथील रहिवासी असलेल्या मुल्ला यांच्या या सन्मानामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रेठरे खुर्द ग्रामपंचायत तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अस्लम मुल्ला यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्यातून युवकांना प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
You must be logged in to post a comment.