बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेचे राज्यस्तरीय यश

‘मायेचा एक घास जवानांसाठी’ ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): आधार फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त सीमेवर देशरक्षणासाठी तैनात असलेल्या भारतीय जवानांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित ‘मायेचा एक घास जवानांसाठी’ या राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत साताऱ्यातील बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत शाळेतील तब्बल १२० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. देशभक्ती, सर्जनशीलता आणि कलात्मकतेचा सुंदर संगम दाखवणाऱ्या कलाकृतींमधून कु. शर्वरी शिंदे, कु. दुर्गा गावडे आणि कु. तेजस्विनी काशीद या तिन्ही विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या ग्रीटिंग कार्डमध्ये भारतीय जवानांप्रती कृतज्ञता, ममत्व आणि प्रेरणादायी विचारांचे प्रभावी दर्शन घडले.

या यशस्वी विद्यार्थिनींना शाळेच्यावतीने विशेष गौरविण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संदीप मस्के यांच्यासह शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सत्कार करून आनंद व्यक्त केला. या विद्यार्थिनींना प्रा. सौ. दीपाली बुधावले यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा. सौ. दीपाली बुधावले यांनी विद्यार्थिनींच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्या लहानशा प्रयत्नातून देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या कलाकृतींमधून देशप्रेम, त्याग आणि आपुलकीचे सुंदर दर्शन घडले. हे यश विद्यार्थिनींच्या मेहनतीचे आणि आमच्या शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे.

विद्यार्थिनींनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी शुभेच्छा देण्याची संधी मिळाल्याने आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. आमची ही लहानशी भेट त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणेल, हीच आमच्यासाठी खरी आनंदाची गोष्ट आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून संस्थेचे अध्यक्ष आनंद गुरव, सचिव मंगेश मुंद्रावळे, सर्व संचालक, शिक्षकवर्ग व पालकवर्ग यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

error: Content is protected !!