घरगुती सिलिंडरच्या दरवाढीविरुद्ध साताऱ्यात काँग्रेसचे आंदोलन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांची वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. काँग्रेस पक्ष व युवक काँग्रेस अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘शक्ती अभियान’ अंतर्गत प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुषमा राजेघोरपडे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका येथे भर चौकात चुली पेटवून भाकरी थापून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला.
‘पेटलाय गॅस, विजवा सरकार’, ‘मोदी हटाव, देश बचाव’ अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात महिला आणि युवकांचा मोठा सहभाग होता. आंदोलन करताना सुषमा राजेघोरपडे म्हणाल्या, “मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी केली आहे. खास करून महिलांच्या घरगुती अर्थसंकल्पावर या दरवाढीचा मोठा आघात झाला आहे. लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे.
गॅसचे दर अचानक ५० रुपयांनी वाढवायचे आणि पंधरा दिवसांनी दहा रुपयांनी कमी करून ‘सवलतीचे नाटक’ करायचं’ ही सरकारची जनतेला फसवण्याची क्लृप्ती आहे. हे सरकार दिशाभूल करण्यात तरबेज आहे. दरवाढ तातडीने मागे घेतली नाही, तर शक्ती अभियान अंतर्गत भव्य जनआंदोलन उभं केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात प्राची ताकतोडे, वृषाली जाधव, अरबाज शेख, विजय मोरे, आशा साळुंखे, कांताताई साळुंखे, रोहिणी यादव, धनश्री मालुसरे, अंजली कांबळे, श्रीकांत कांबळे, मोहनराजे घोरपडे, नंदकुमार खामकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

You must be logged in to post a comment.