बेकायदा जमीनवाटप रोखण्यासाठी घेणार कायद्याचा आधार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यातील गायरान जमिनींवर सौर प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वाटपाविरोधात आता लढा न्यायालयात नेण्याची तयारी पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दर्शवली आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र शासनातील विविध यंत्रणांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या असून, मागण्या मान्य न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
सुशांत मोरे यांनी याआधी कराड ते सातारा लॉंग मार्चद्वारे शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी लढा दिला होता. आता ते ९ ऑगस्ट म्हणजेच क्रांतीदिनापासून मंत्रालयावर मोटारसायकल रॅली काढणार असून, हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ॲड. तृणाल टोणपे व ॲड. निकिता आनंदाचे यांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या नोटिशींमध्ये सौर प्रकल्पासाठी गायरान जमिनीचे वाटप बेकायदेशीर असल्याचे ठामपणे नमूद करण्यात आले आहे.या नोटिशा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी (सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर), उद्योग विभागाचे प्रधान सचिव, वन विभाग, वीज वितरण कंपनी व पर्यावरण मंत्रालय अशा अनेक प्राधिकरणांना पाठवण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल १,३२३ एकर गायरान जमीन फक्त १ रुपया प्रति एकर दराने खासगी कंपन्यांना भाड्याने देण्यात आली असून, हे वाटप पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६, वन (संवर्धन) कायदा, १९८०, आणि जैवविविधता कायदा, २०२२ यांच्या विरोधात आहे, असा ठपका मोरे यांनी ठेवला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘जगपाल सिंग विरुद्ध पंजाब राज्य (२०११)’ या ऐतिहासिक निकालाचा संदर्भ देत असे प्रकार कायद्याने रोखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. खटाव तालुक्यातील गोरेगाव-वांगी येथे ४० वर्षे जुनी झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याची तक्रारही यामध्ये करण्यात आली आहे.
मोरे यांनी म्हटले आहे की, अशा प्रकल्पांमुळे भूजल पातळी घटणे, जैवविविधता नष्ट होणे आणि सौर पॅनेलमधून निर्माण होणाऱ्या घातक कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट यांसारखे दुष्परिणाम साताऱ्यातही दिसू शकतात, ज्याचे उदाहरण राजस्थानात पाहायला मिळाले आहे.
एजंटगिरी थांबवा, अन्यथा भांडाफोड करणार!
एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष स्वतःच्या पक्षाचे काम सोडून शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या गायरान जमिनींच्या व्यवहारातून फायद्याचा वाटा घेत आहे, असा गंभीर आरोप सुशांत मोरे यांनी केला आहे. “जर त्याने हे व्यवहार थांबवले नाहीत, तर योग्य वेळी त्याचाही भांडाफोड केला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

You must be logged in to post a comment.