गणेशोत्सवासाठी सातारकर सज्ज; एक खिडकी योजना, डॉल्बी परवानगीसह विविध मागण्या

गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय बैठकीत सूचनांचा पाऊस; प्रशासनाचा सहकार्याचा दिलासा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरात येत्या २७ ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी शाहू कला मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत डॉल्बी परवानगी, वीजदर सवलत, रस्त्यांचे दुरुस्ती काम, विसर्जन मिरवणुकीचे नियोजन अशा अनेक मागण्या मंडळांच्या वतीने मांडण्यात आल्या.

या बैठकीत सातारा जिल्हा पोलीस प्रशासन, नगरपालिका, वीज वितरण कंपनी, प्रादेशिक परिवहन विभाग, महसूल विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने होते. प्रांताधिकारी आशिष बारकुल, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, शाहूपुरी पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, वीज वितरण कंपनीचे अभियंता आशिष नवाळे, तसेच सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट हे मान्यवरही उपस्थित होते.

गणेशोत्सव मंडळांच्या वतीने ‘एक खिडकी योजना’ प्रभावीपणे राबवण्याची मागणी झाली. गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या – वीज, ध्वनिक्षेपक, जागा वापर, धर्मादाय आयुक्त यांची मंजुरी इत्यादी – एकाच ठिकाणी, म्हणजेच नगरपालिका सभागृहात मिळाव्यात, जेणेकरून मंडळांना विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. मंडळांनी या प्रक्रियेसाठी सर्व विभागांचे प्रतिनिधी एकत्र बसवावेत अशी मागणी केली.

तसेच, शेवटच्या चार दिवसांसाठी डॉल्बी सिस्टीमसाठी चार बेस व चार टॉप वापरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांनी मांडली. विसर्जनासाठी सातारा शहरात कायमस्वरूपी विसर्जन तळे असावे, वीज वितरण कंपनीने धार्मिक उपक्रमांतर्गत वीजदर सहा रुपये प्रति युनिट आकारावा, अशी मागणीही बैठकीत झाली.

सातारा शहरातील प्रमुख चौक, शाळा, रस्ते, वर्दळीची ठिकाणे येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, वाहतूक नियमन करणे, नो पार्किंग झोन तयार करणे, ओपन गटारे बंदिस्त करणे, हायमास्ट दिवे कार्यान्वित ठेवणे अशा अनेक सूचना कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मांडल्या. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी रस्त्यांवर नो व्हेईकल झोन जाहीर करावा आणि दोन्ही मंडळांच्या मिरवणुका समोरासमोर आल्यास अडथळा निर्माण होऊ नये यासाठी योग्य समन्वय साधावा, अशी मागणी उपस्थित मंडळांनी केली.

वीज वितरण कंपनीने घेतलेले डिपॉझिट रक्कम दोन दोन वर्षे परत न करता ठेवते, त्यामुळे तीच रक्कम पुढील वर्षांसाठी वापरण्याची सवलत द्यावी आणि परत परत डिपॉझिट मागू नये, अशी मागणी श्रीकांत शेटे यांनी केली. विसर्जन मिरवणूक दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची, राजवाडा चौपाटीला विशेष परवानगी देण्याची सूचना देखील देण्यात आली.

मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी सातारा नगरपालिका ५४ लाख रुपयांचा खर्च करत असून, विसर्जन तलाव, लाईव्ह गार्ड, पाण्याचे लायनर, क्रेन, लोखंडी हाऊस, व्हिडिओ चित्रीकरण, सीसीटीव्ही कॅमेरे या सर्व सुविधा दिल्या जातील, असे सांगत सर्व शक्य ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने म्हणाले, साताऱ्यातील सर्व मंडळांनी कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करावा. प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, मात्र नागरिकांनी जबाबदारीने वर्तन करणे आवश्यक आहे. समन्वय आणि संयम राखल्यास उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीत माजी शिवसेना प्रमुख नरेंद्र पाटील, चंद्रशेखर घोडके, अभिजीत बारटक्के, धनंजय शिंदे, पंकज चव्हाण, सुनील काळेकर, अभिजीत साळुंखे यांनी देखील सहभाग घेत विविध सूचना मांडल्या. यावेळी विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!