आई-बाबांच्या शब्दांतून मिळाले बळ : धैर्या कुलकर्णी
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : युरोपातील सर्वात उंच माऊंट एल्ब्रूस (५,६४२ मी.) शिखर सर करून भारताचा तिरंगा डौलाने फडकावणारी अवघ्या १३ वर्षांची सातारची ‘शिखरकन्या’ धैर्या कुलकर्णी शनिवारी संध्याकाळी साताऱ्यात दाखल होताच तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण झाले.
ढोल-ताशांचा गजर, तुताऱ्यांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष यामुळे वातावरण भारावून गेले. नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ मंडळी अशा शेकडो सातारकरांनी तिच्या स्वागतासाठी गर्दी केली.यावेळी शहरात वीरांगनेचे स्वागत करीत असल्याचा अभिमान प्रत्येकाच्या डोळ्यांत चमकत होता.
शिवतीर्थावर अभूतपूर्व स्वागत – सत्कार
एल्ब्रूस मोहिमेतील पराक्रमानंतर धैर्याचे स्वागत करण्यासाठी मावळा फाउंडेशन, जनता सहकारी बँक, गुरुकुल स्कूल यांच्यासह विविध संस्थांनी पुढाकार घेतला. पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर हा स्वागत सोहळा दिमाखात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात धैर्या व तिचे बाबा विनोद कुलकर्णी, आई ज्योती कुलकर्णी, मोठी बहीण शौर्या कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते धैर्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक पुढारीचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण , पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे,गुरुकुल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, भाजपचे सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, मनोज शेंडे, प्रीतम व सौ. शिवानी कळसकर, जनता बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते, वसंत जोशी, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अवघ्या १३ व्या वर्षी जग जिंकले!
उणे १४ अंश तापमान, चारही बाजूंनी शुभ्र बर्फ आणि श्वास रोखून टाकणारे वातावरण… अशा प्रतिकूल परिस्थितीत तिरंगा फडकावत धैर्याने सर केलेले एल्ब्रूस हे यश तिच्या जिद्दीचे प्रतीक आहे. अवघ्या १३ वर्षांच्या वयात एल्ब्रूस सर करणारी ती मोहिमेतील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली असून, तिच्या कर्तृत्वाने सातारा जिल्हा आणि भारताचा अभिमान द्विगुणित केला आहे. याआधी तिने एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प, आफ्रिकेतील किलीमांजारोसह अनेक शिखरे सर करूनच आपल्या ध्येयवेड्या स्वभावाची छाप सोडली आहे.
स्वागत सोहळ्यात धैर्याचे आई-बाबा व मोठी बहीण शौर्या कुलकर्णी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. ‘धैर्याने साताऱ्याचे नाव जगभर झळकवले, हीच आमच्यासाठी खरी शिदोरी आहे,’ असे समाधान त्यांनी व्यक्त केले. शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावून तिच्या पराक्रमाला सलाम करून धैर्याने अजून उंच शिखरे सर करावीत, यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
आई-बाबांच्या शब्दांतून मिळाले बळ!
धैर्या, तुला हे शिखर सर करायचे आहे आणि ते तू जिंकशीलच..! आई-बाबांचे हे शब्द आठवत आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याची ऊर्जा मनात जागृत करूनच एल्ब्रूस मोहिम पार केली, असे मनोगत धैर्याने व्यक्त केले. “आई-वडिलांचे प्रोत्साहन, मार्गदर्शक कैलास बागल आणि प्रियांका मोहिते यांचे मार्गदर्शन, तसेच गुरूकुल स्कूलचा पाठिंबा नसता, तर हे यश शक्य झाले नसते. साताऱ्याचे नाव युरोपमध्ये झळकवता आले, याचे समाधान वाटते,” असेही तिने सांगितले.
You must be logged in to post a comment.