अजिंक्यतारा कारखाना सेवक पतसंस्थेची सभा उत्साहात

सभासदांना १२ टक्के लाभांश; गणेशोत्सवात भव्य क्रीडा स्पर्धा

शाहूनगर, शेंद्रे (महेंद्रआबा जाधवराव) : अजिंक्य उद्योग समूहाच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सेवकांची पतसंस्था व कामगार ‘श्री’ गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी पतसंस्था सभासदांना तब्बल १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. तसेच गणेशोत्सव काळात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह क्रिकेट, बॅडमिंटन व रस्सीखेच अशा भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

अजिंक्य उद्योग समूहाचे सर्वेसर्वा ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा सह. साखर कारखाना सेवकांची पतसंस्था व कामगार ‘श्री’ गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन दिनेश चव्हाण तर सेक्रेटरी बशीर संदे, कार्यालय अधीक्षक सयाजी पाटील, प्रोडक्शन मॅनेजर सुरेश धायगुडे, वर्क्स मॅनेजर रणजित पोळ, मुख्य लेखापाल प्रविण जाधव, सिव्हिल इंजिनियर शिवाजी थोरात, लेबर ऑफिसर ॲड. रणजित चव्हाण, पर्चेस ऑफिसर पांडुरंग पवार, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व गार्डन विभाग प्रमुख प्रविण जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

सेक्रेटरी बशीर संदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्व. श्रीमंत छ. अभयासिंहराजे भोसले यांच्या प्रेरणेने उभा राहिलेला अजिंक्य उद्योग समूह शेतकरी व कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील आहे. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कल्पक नेतृत्वाखाली अजिंक्य उद्योग समूहातील सर्व संलग्न संस्थांच्या पारदर्शक कारभारामुळेच संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे स्पष्ट केले. तसेच साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री.संदे यांनी केले.

चेअरमन दिनेश चव्हाण यांनी संस्थेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेत १२ टक्के लाभांशाची घोषणा केली. तर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व गार्डन विभाग प्रमुख प्रविण जाधव यांनी धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांसह क्रीडा स्पर्धांची माहिती दिली.

सभेस पर्यावरण विभाग प्रमुख बी. डी. पोवार, सॅनिटेशन विभाग प्रमुख संजीवन कदम, सरपंच व इंधन विभागप्रमुख कृष्णा कांबळे, स्टोअर विभाग प्रमुख गाडे, केनयार्ड विभाग प्रमुख पांडुरंग कुंभार, कामगार युनियनचे अध्यक्ष दिलीप शेडगे व पदाधिकारी, माजी कामगार संचालक नितीन भोसले, प्रशासन विभागाच्या सहकारी व पतसंस्थेच्या संचालिका सौ. आरती भंडारे, सौ. रेश्मा काळे, सौ. सुप्रिया देशमुख आदी मान्यवरांसह कामगार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पतसंस्थेच्या सभेचे नोटीस वाचन सेक्रेटरी संभाजी पाटील यांनी तर गणेशोत्सव मंडळाचे नोटीस वाचन सेक्रेटरी पांडुरंग कुंभार यांनी केले. प्रोडक्शन मॅनेजर सुरेश धायगुडे यांनी प्रास्ताविक केले तर विष्णू जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन लेबर ऑफिसर ॲड. रणजित चव्हाण यांनी केले.

error: Content is protected !!