सेवापूर्तीचा सन्मान!

जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णू शिंदे यांचा गौरवपूर्ण सत्कार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्हा माहिती कार्यालयात 33 वर्षे 7 महिने प्रदीर्घ व निःस्वार्थ सेवा बजावणारे वाहनचालक श्री. विष्णू पांडुरंग शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने गौरव करण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभास श्री. शिंदे यांच्या पत्नी नंदा शिंदे, इतर कुटुंबीय, आणि कार्यालयातील सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ लिपिक वैभव जाधव, लिपिक-टंकलेखक आराध्या लोंढे, अनिल नलवडे, सचिन राऊत, अनिता काशीद, अक्षय शिंदे, आदित्य शिंदे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

श्री. शिंदे यांनी वाहनचालक म्हणूनच नव्हे तर कुशल कॅमेरामन म्हणूनही शासकीय कार्यक्रमांचे छायाचित्रण आणि चित्रीकरण अतिशय जबाबदारीने सांभाळले. त्यांनी सर्व माध्यम प्रतिनिधींशी उत्तम समन्वय साधून शासकीय योजना, कार्यक्रम व यशकथा प्रसारित करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले, असे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी काढले.

पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनीही संदेशाद्वारे शिंदे यांच्या कार्याची स्तुती केली. “वाहनचालक पदावर कार्यरत असतानाही त्यांनी फोटोग्राफीच्या क्षेत्रात विशेष कौशल्य दाखवले. वाहनचालक आणि कॅमेरामन ही दुहेरी भूमिका ते यशस्वीपणे पार पाडत होते. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!” असे डॉ. मोघे यांनी आपल्या संदेशात नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करून श्री. शिंदे यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!