पावसामुळे धोका वाढला, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक ‘चारभिंती हुतात्मा स्मारक’ परिसरात सध्या विषारी विंचवांचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येत आहे. पावसामुळे जमीन ओली झाल्याने आणि आर्द्रता वाढल्यामुळे हे विंचू त्यांच्या छुप्या ठिकाणांमधून बाहेर पडत असून, स्मारक परिसरात फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने या परिसरात दररोज येत असतात. गप्पा मारण्यासाठी, फिरण्यासाठी व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ही जागा साताऱ्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. मात्र सध्या येथे विषारी विंचवांचा वाढता वावर दिसून येत असल्याने विशेष काळजी घेणे अत्यावश्यक ठरत आहे.
या संदर्भात मोनिश अवघडे, धीरज पाटोळे, अक्षय वनारे, श्रीधर पाटोळे, आदित्य गायकवाड आणि राहुल निकम या तरुणांनी या धोक्याची दखल घेत सोशल मीडियावर प्रत्यक्ष विंचवांचे व्हिडिओ शेअर करत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

चारभिंती हे स्मारक छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी १८३० साली उभारले. त्याकाळी ‘नजर महाल’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण विजयादशमी मिरवणुकीत राजघराण्यांतील महिलांसाठी सुरक्षित स्थळ होते. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांच्या सन्मानार्थ येथे स्मारक उभारण्यात आले. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशिला येथे पाहायला मिळतात. २००१ साली या स्मारकाचे नुतनीकरण करण्यात आले असून, आज हे ठिकाण इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरले आहे.

मात्र या ऐतिहासिक परिसरात वाढलेल्या विंचवांच्या धोक्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्मारक परिसर झाडाझुडपांनी वेढलेला असल्याने आणि पावसामुळे विंचूंना बाहेर पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने, त्यांचा वावर वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ फवारणी, परिसर स्वच्छता आणि चेतावणी फलक लावण्यासारख्या उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान, या स्मारकास भेट देणाऱ्या प्रत्येकाने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. उघड्या पायांनी किंवा चप्पलमध्ये परिसरात फिरणे टाळावे. मुले आणि वयोवृद्धांनी पायाखाली लक्ष देऊन वावरावे. झाडाखाली किंवा दगडाजवळ बसताना विशेष काळजी घ्यावी. विंचू आढळल्यास त्वरित नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळी पर्यटन बेतानेच!
पाऊस सुरू झाला की अनेक सातारकर शहराच्या आसपास असलेल्या डोंगरांवर फिरायला जातात. परंतु अवेळी आणि अतिरेकी पाऊस झाल्यास अनेक धोके संभवतात. आपल्याप्रमाणेच अनेक सजीवांना पाऊस अनपेक्षित असतो. त्यामुळं चारभिंतीवरील विंचवांप्रमाणे ते सैरभैर होऊन बाहेर पडण्याची शक्यता असते. याखेरीज मुसळधार पावसामुळं दरड कोसळण्याचा धोकाही वाढतो. म्हणूनच पावसाळी पर्यटन करताना स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहन पर्यावरण क्षेत्रातील जाणकारांनी केलंय.
स्मारकांचा सन्मान राखताना आपल्या सुरक्षिततेचाही विचार करणे आवश्यक आहे. एकीकडे आपण हुतात्म्यांच्या स्मृती जपतो, तर दुसरीकडे अशा ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि योग्य ती पावले उचलावीत.
- मोनिश अवघडे

You must be logged in to post a comment.