गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीत नियमभंग करणाऱ्या डॉल्बी जप्त

सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई; ट्रॅक्टर चालक व डॉल्बी मालकांवर गुन्हा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : डबेवाडी (ता. सातारा) येथे श्री गणेशाचे आगमन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांनी परवानगीपेक्षा जास्त आवाजात डॉल्बी वाजवून सज्जनगड–सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी केली. या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळताच सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीदरम्यान तक्रारीत तथ्य आढळल्याने संबंधित मंडळाचे अध्यक्ष, डॉल्बी मालक आणि ट्रॅक्टर चालक यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले असून डॉल्बी यंत्रणा आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीच पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे उत्सवाच्या सुरुवातीपासूनच नियम मोडणाऱ्यांवर कुणाचीही गय केली जाणार नाही, असा ठोस संदेश जिल्ह्यातील सर्व मंडळांना देण्यात आला आहे. डॉल्बी वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व मर्यादांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी आधीच दिल्या असून, त्याच पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांकडून डबेवाडीत हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे.

मंगळवारी दि.२६ रोजी डबेवाडी परिसरातील गणेशोत्सव मिरवणुका सुरू असताना दोन मंडळांनी परवानगीपेक्षा मोठ्या प्रमाणात डॉल्बी लावून वातावरण दणाणून टाकले. या प्रचंड आवाजामुळे सज्जनगड–सातारा रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत तक्रार केली. त्यानुसार तालुका पोलिसांनी कारवाई करत मंडळांचे पदाधिकारी व संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा नोंदविला.

या कारवाईत पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस हवालदार राजू शिखरे, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, दादा स्वामी, किरण निकम, प्रदीप मोहिते, संदीप पांडव व शंकर गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, सातारा तालुका पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार डॉल्बीचा वापर कडक अटींसह मर्यादित आहे. परवानगीशिवाय किंवा नियमभंग करून डॉल्बी लावणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल. उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.”

  • निलेश तांबे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलिस स्टेशन.
error: Content is protected !!