चाकूहल्ल्यात दोन पोलीस जखमी झाल्यानंतर कारवाई; साथीदार पसार
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : दरोडा, घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेला कुख्यात गुन्हेगार लखन भोसले (रा. जयराम स्वामींचे वडगाव, ता. खटाव) हा पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या थरारक कारवाईत ठार झाला. त्याचा साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातारा परिसरात दरोडा आणि चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, सातारा शहर पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना लखन भोसले आणि त्याचा साथीदार या पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर भागात असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिक्रापूर परिसरात सापळा रचला. त्यावेळी लखन आणि एका आरोपीस पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांवरच सशस्त्र हल्ला केला. चाकूचे वार झाल्याने दोन पोलीस जखमी झाले. या परिस्थितीत आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात लखन भोसले गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला.
लखन भोसले याच्यावर सातारा, सांगली, पुणे व इतर जिल्ह्यांत घरफोडी, दरोडे, चोरी, मारहाण यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारी जगतात त्याची दहशत होती. सातारा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शिक्रापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पळून गेलेल्या आरोपीला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
‘त्या’ फुटेजमुळे धास्तावलेले सातारकर
कोरेगाव–सातारा रस्त्यावर मेडिकल कॉलेज इमारतीसमोर गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना लखन भोसलेने कोयत्याचा धाक दाखवत पाठलाग केला. त्याने एका महिलेला जमिनीवर पाडून गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच सातारकरांमध्ये भीतीची लाट पसरली. सातारा शहर पोलिसांनी तत्काळ मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली. त्या फुटेजमधून लखन भोसले स्पष्टपणे दिसून आल्याने त्याच्यावर संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसांनी लखन व त्याच्याशी संबंधित इतर गुन्हेगारांकडे तपासाची सूत्रे वळवली आणि हीच कारवाई अखेर त्याच्या एन्काउंटरपर्यंत पोहोचली.
लखनवर खुनाच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. नुकताच तो तुरुंगातून सुटला होता. चाकूचा धाक दाखवून महिलांचे दागिने लुटल्याचे दोन गुन्हे लखनविरुद्ध सातारा पोलिसांत दाखल झाले होते. त्या अनुषंगाने त्याच्या शोधार्थ सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूरला गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार लखन आणि त्याचा साथीदार त्या परिसरात होते. परंतु पळून जाण्यासाठी आरोपींनी पोलिसांवर चाकूहल्ला केला. एका पोलीस कर्मचाऱ्याला बरगड्यांजवळ, तर दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या हाताला जखम झाली. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी झाडलेली गोळी लखनला लागून तो जखमी झाला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
You must be logged in to post a comment.