ओबीसी आरक्षण बचावासाठी साताऱ्यात मोर्चा

जीआर तातडीने मागे घ्या, अन्यथा राज्यभर आंदोलन पेटवू : ॲड. महेश गोरे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा घेतलेला निर्णय ओबीसी समाजासाठी अन्यायकारक, बेकायदेशीर व असंविधानिक असल्याचा निषेध साताऱ्यात व्यक्त करण्यात आला. ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने सोमवारी शिवतीर्थ पोवई नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या आंदोलनाला सुरुवात झाली. या मोर्चाचे नेतृत्व महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी. के. यादव आणि ॲड. महेश गोरे यांनी केले. सकाळी दहा वाजता निघालेल्या या मोर्चात ओबीसी समाजाचे शंभराहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना या संदर्भात निवेदन सादर करून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, खोट्या कुणबी नोंदी रद्द कराव्यात, शासनाने काढलेला जीआर तात्काळ मागे घ्यावा आदी मागण्या करण्यात आल्या .

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. महेश गोरे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण नक्की द्यावे; परंतु ते ओबीसी प्रवर्गातून देणे अन्यायकारक आहे. आमच्या समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

मोर्चात बापुराव शिंदे, गोविंदराव भुजबळ, राजेंद्र कोरडे यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी, विविध ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!