सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेवरून पालकमंत्र्यांचा संताप

आठ दिवसांत उपाययोजना न झाल्यास कायदेशीर कारवाईचे स्पष्ट निर्देश

नवारस्ता,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास संबंधित संस्थांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे पोलिस, महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक रस्ते, मंदिरे, रुग्णालये, एसटी बसस्थानके अशा ठिकाणी साचलेल्या कचऱ्याचा मुद्दा उपस्थित करत पालकमंत्र्यांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या अस्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून, तात्काळ दखल घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

गटविकास अधिकारी व पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी कार्यक्षेत्रात स्वतंत्र स्वच्छता पथक नेमण्याबाबत सूचना देण्यात आल्या. रात्री अपरात्री सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना तातडीने नोटीस बजावण्यात यावी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही देसाई यांनी दिल्या.

कचरा टाकणाऱ्या व्यक्तींविरोधात जनजागृती करण्याबरोबरच कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था स्थानिक संस्थांनी उभारावी. तरीही नियम तोडले गेले, तर अशा व्यावसायिक स्थळांवर – हॉटेल्स किंवा दुकाने – सील करण्याची कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, असा कडक इशारा त्यांनी दिला.

या संपूर्ण मोहिमेचे नियंत्रण प्रांताधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी, पाटण यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ही मोहीम प्रथम पाटण तालुक्यात सुरू होणार असून, यशस्वी अंमलबजावणीच्या आधारावर संपूर्ण सातारा जिल्ह्यात ही कारवाई राबवली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने पालकमंत्र्यांनी घेतलेली ही भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सरकारी निर्देशांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर प्रशासन कडक पावले उचलणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीत मिळाले आहेत.

error: Content is protected !!