जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौथ्या दिवशीही उपोषण सुरू; उपोषणकर्ते महेश शिवदास यांची आक्रमक भूमिका

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कास पठार परिसरातील गौण खनिज उत्खनन प्रकरणात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना चौकशीपासून दूर ठेवले, असा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी त्यांच्याकडे नैतिकतेच्या आधारे तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे. ते गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
यासंदर्भात उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवदास म्हणाले, कास पठार कार्यकारी समिती व वन विभागाच्या संगनमताने रस्त्यांना हानी पोहचवून लाल मातीसारख्या गौण खनिजांची खाजगी विक्री करण्यात आली आहे. या मातीचे ढिग रस्त्यालगत साठवून कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही. मी २४ जुलै रोजी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
शिवदास यांनी यावेळी असेही सांगितले की, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी ३० जुलै रोजी चर्चेसाठी बोलावले होते, मात्र या चर्चेत सहाय्यक वनसंरक्षक, मेढा तहसीलदार, अंधारी ग्रामपंचायत यांच्याकडून दिशाभूल करणारी पत्रे सादर करण्यात आली. ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, मेढा प्रांताधिकारी आणि संबंधित शासकीय यंत्रणा हे सर्व मिळून या प्रकरणात सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ‘माझी परवानगी घ्या’ असा स्पष्ट आदेशच पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे, असा धक्कादायक खुलासा महेश शिवदास यांनी केला. जिल्हा प्रशासनातील अधिकारीही ‘आम्ही कारवाई करू शकत नाही’ असे सांगत आहेत, म्हणजेच पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळेच चौकशीला ब्रेक लागला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ही संपूर्ण प्रक्रियाच आता मंत्र्यांच्या परवानगीवर अवलंबून राहिली असून, त्यांचा पदाचा सरळ गैरवापर सुरू आहे, असा रोषही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या प्रकरणात जिल्हा प्रशासनाची भूमिका संशयास्पद आणि उदासीन असल्याची तीव्र नाराजीही महेश शिवदास यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवसांपासून उपोषणाला बसलो आहे, मात्र आजपर्यंत कुणीही ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे मी ही लढाई पुढे चालू ठेवणार असून, यामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांना बडतर्फ करावे, अशी माझी स्पष्ट मागणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

You must be logged in to post a comment.