महिलांच्या तक्रारींकडे संवेदनशीलतेने पाहा : ना. शंभुराज देसाई

कायदा-सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले स्पष्ट आदेश

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): “मानसिक त्रास, छेडछाड, हुंडा संबंधित महिलांच्या तक्रारींवर पोलीस विभागाने विलंब न करता तात्काळ कारवाई करावी आणि दोषींवर कठोर पावले उचलावीत,” असा स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

साताऱ्यातील शिवतेज सभागृहात आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, तसेच विविध पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी महिला पथदर्शी प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देत, महिलांच्या तक्रारी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्याचे निर्देश दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “महिलांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी पोलिसांनी तत्परतेने आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.

पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे कास पठार, ओझर्डे, सडावाघापूरी धबधबा आदी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हुल्लडबाज प्रवृत्तींचा आळा घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

पोलीस खात्याला सहकार्याची ग्वाही पोलीस विभागाला आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही देत पालकमंत्री म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आणि पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेची उंची वाढवावी.

error: Content is protected !!