२ जूनला सीईओ कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा; मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्हा परिषदेमधील विविध विभागांत झालेल्या बदल्या या चुकीच्या पद्धतीने, मनमानी आणि हेतुपरस्पर करण्यात आल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे. या बदल्यांविरोधात २ जून रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात मोरे यांनी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या प्रशासनिक अनियमिततेचा शिखर बिंदू म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या बदल्यांची प्रक्रिया असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थ, कृषी, पशुसंवर्धन, एकात्मिक बालविकास सेवा योजना, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत या विभागांतील प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या वेळापत्रकानुसार करण्यात आल्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक ठिकाणी रिक्त पदे असतानाही ती लपवण्यात आली, कर्मचारी मागणी करूनही त्या ठिकाणी बदल्या न करता पदे जाणीवपूर्वक रिक्त ठेवण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे.
या सर्व बदल्यांमागे प्रशासकीय दबाव, हेतुपुरस्सर निर्णय आणि अधिकार्यांची मनमानी असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. त्यांनी म्हटले आहे की, काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमाप्रमाणे झाल्या असल्या तरी अनेक कर्मचाऱ्यांना अन्यायकारकपणे डावलण्यात आले. या साऱ्या प्रकरणात संबंधित अधिकारी, खातेप्रमुख आणि विभागप्रमुख यांचा सहभाग असून, १ मे ते आजअखेरचे त्यांचे कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप कॉल्स आणि सीडीआर तपासावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तसेच आतापर्यंत झालेल्या बदल्यांचा फेरविचार करून नव्याने निपक्षपाती आदेश निघावेत, अन्यथा २ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास पुढील सर्व परिणामांसाठी प्रशासन जबाबदार राहील, असेही मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

You must be logged in to post a comment.