महाराणी येसूबाई यांचे स्मारक राज्य संरक्षित; ऐतिहासिक स्थळाला मिळाला न्याय

खा. उदयनराजे, ना. शिवेंद्रराजे यांच्या पुढाकाराने अधिसूचना जारी; सुहास राजेशिर्के यांनी दिली माहिती

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांच्या समाधीला अखेर राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला आहे. राज्य शासनाने ८ जानेवारी रोजी अंतिम अधिसूचना काढून हा ऐतिहासिक निर्णय घेतला. या कामी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, तसेच नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांचे अथक प्रयत्न कामी आले.

माजी उपनगराध्यक्ष आणि महाराणी येसूबाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी महाराणी येसूबाई यांच्या समाधीच्या स्थानाचा शोध लावण्यापासून ते त्या ऐतिहासिक स्मारकाला राज्य संरक्षित दर्जा मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अभिमान व्यक्त केला. त्यांनी म्हटले, “आम्ही आणि आमच्या फाऊंडेशनने या ऐतिहासिक स्थळाच्या संरक्षणासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले होते. आज त्या प्रयत्नांना यश मिळाले असून, स्मारकाला राज्य संरक्षित दर्जा प्राप्त झाला आहे. हे कार्य खासदार श्री. छ. उदयनराजे आणि मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे.

तीनशे वर्ष विस्मृतीत गेलेली समाधी शोधली

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाई यांनी औरंगजेबाच्या कैदेत १९ वर्षे संघर्षमय जीवन व्यतीत केले. त्यांनी आपल्या सुपुत्र छत्रपती शाहू महाराजांवर धर्म व प्रशासनाचे संस्कार केले. शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याचा विस्तार करून साताऱ्याला राजधानीचा दर्जा दिला. महाराणी येसूबाई यांच्या अखेरच्या दिवसांत त्या साताऱ्यात होत्या. त्यांची समाधी संगम माहुली येथे बांधण्यात आली होती.परंतु इतिहासाच्या विस्मृतीत गेलेल्या या समाधीचा शोध २०१३ पासून महाराणी येसूबाई फाऊंडेशन आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेने घेतला. अखेर २०२३ मध्ये समाधीचे स्थान निश्चित करण्यात आले आणि पुरातत्व विभागाकडे संशोधन अहवाल सादर करण्यात आला.

खासदार आणि मंत्र्यांचा ठाम पाठपुरावा

महाराणी येसूबाई यांची समाधी संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यासाठी साताऱ्याचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. शिवभक्त आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर त्यांनी शासनाकडे जोरदार मागणी केली. नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनीही त्यांच्या स्तरावर पाठपुरावा केला. परिणामी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ८ जानेवारी रोजी अंतिम अधिसूचना काढून समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे योगदान

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्या विभागाने या कामाला वेग देऊन समाधी संरक्षित स्मारक करण्याचा निर्णय घेतला.

समाधीचे क्षेत्रफळ आणि स्थान

महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे क्षेत्रफळ ४६.४५ चौरस मीटर असून, समाधीच्या परिसरात पूर्वेला आनंदराव भासले यांचे घर, पश्चिमेला संगम माहुली गावठाण, उत्तरेला मोकळी जागा, तर दक्षिणेला कृष्णामाई रथ यात्रा शेड आहे.

शिवभक्तांचा विजय

शिवभक्त आणि इतिहासप्रेमींनी महाराणी येसूबाई यांच्या स्मारकासाठी उचललेला लढा अखेर फळास आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे साताऱ्यातील ऐतिहासिक वारसा आणखी सशक्त होईल आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल.

“महाराणी येसूबाई यांनी केवळ मराठा साम्राज्याचा इतिहास घडवला नाही तर एक आदर्श आणि प्रेरणादायी जीवन त्यांनी जगले. या स्मारकामुळे इतिहासप्रेमी आणि भविष्यातील अभ्यासकांना त्यांचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे समजेल.”

  • सुहास राजेशिर्के, संस्थापक अध्यक्ष, महाराणी येसूबाई फाऊंडेशन.
error: Content is protected !!