जन्म-मृत्यू नोंदणी पोर्टल वारंवार बंद; नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही त्रास

महारूद्र तिकुंडे यांचे सरकारला निवेदन; आंदोलनाचा इशारा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यातील जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तयार केलेले पोर्टल सतत बंद पडत असल्याने सामान्य नागरिकांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा शासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे माहिती अधिकार कार्यकर्ते महारूद्र तिकुंडे यांनी दिला आहे.

वारंवार बिघाड; कामकाज ठप्प

गेल्या काही महिन्यांपासून जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी असलेले पोर्टल वारंवार बंद पडत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, दाखल्यांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या घालाव्या लागत आहेत. नागरिकांच्या रोषाला सामोरे जात असलेले कर्मचारीही तणावाखाली आहेत. “अनेक वेळा पोर्टल बंद असल्याचे सांगून काम थांबवले जाते, यामुळे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनातील मागण्या

तिकुंडे यांनी सादर केलेल्या निवेदनात, जन्म-मृत्यू नोंदणी पोर्टल तातडीने सुरळीत करावे, पोर्टलच्या देखभालीसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी विशेष तांत्रिक पथक नेमावे, नागरिकांना कामाच्या वेळा व अडथळ्यांची अचूक माहिती पुरवावी अशा मागण्या केल्या आहेत.

कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा

तिकुंडे यांनी सांगितले की, “जर शासनाने या समस्येवर तोडगा काढला नाही, तर लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडले जाईल.” या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव, तसेच जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाची प्रत पाठवली आहे.

कामकाजावर गंभीर परिणाम

सतत पोर्टल बंद राहिल्यामुळे जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी येणाऱ्या नागरिकांची कामे लांबणीवर जात आहेत. यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच, कामाचा बोजा व तणाव वाढल्याने कर्मचारी-वर्गातही अस्वस्थता पसरली आहे.

error: Content is protected !!