“दो घास एस एन व्ही फॅमिली के साथ” स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

माजी नौसैनिकांच्या गप्पा, आठवणींना उजाळा, समाजोपयोगी संकल्प

कराड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): माजी नौसैनिक सेवेतून निवृत्त झाल्यानंतर वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये विखुरले जातात. एकत्र येण्याच्या संधी दुर्मिळ होत जातात. अशा पार्श्वभूमीवर कराड तालुका नौसैनिक ग्रुपने “दो घास एस एन व्ही फॅमिली के साथ” या स्नेहमेळाव्याचे आयोजन करून माजी नौसैनिकांना एकत्र आणण्याचा उपक्रम राबवला. हॉटेल अलंकार, कराड येथे नुकताच पार पडलेला हा स्नेहमेळावा माजी नौसैनिकांच्या एकोप्याचा व समाजासाठी काहीतरी करण्याच्या संकल्पाचा साक्षीदार ठरला.

गप्पांची मैफिल आणि स्नेहभोजन

हॉटेल अलंकारच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये शाकाहारी व मांसाहारी भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. जुन्या आठवणींना उजाळा देत माजी नौसैनिक रमून गेले. १५ वर्षांपासून ६० व्या वर्षांपर्यंत सेवा दिलेल्या नौसैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी सहकुटुंब कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला.

समाजसेवेचा संकल्प

स्नेहमेळाव्यात कराड एस एन व्ही ग्रुपने अनेक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. यामध्ये नौसैनिकांच्या मुलांना शैक्षणिक व आर्थिक मार्गदर्शन करणे, आकस्मिक निधन झालेल्या नौसैनिकांच्या कुटुंबांना मदत व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहाय्य करणे, सहकुटुंब सहलींचे आयोजन करणे याशिवाय, आकस्मिक निधनानंतर कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन मदत करण्याचाही ग्रुपने संकल्प केला आहे.

आठवणींचा ठेवा आणि नव्या पर्वाची सुरुवात

स्व. यशवंतराव चव्हाण यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कराड नगरीतील हॉटेल अलंकारमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत, स्नेहभोजनाचा आस्वाद घेत माजी नौसैनिकांनी एकत्र येण्याचा आनंद साजरा केला. कार्यक्रमाची सांगता पुढील वर्षी अजून मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या संकल्पाने झाली.

सामाजिक बांधिलकीचा आदर्श

“दो घास एस एन व्ही फॅमिली के साथ” हा उपक्रम केवळ स्नेहमेळावा न राहता सामाजिक बांधिलकी आणि एकोप्याचा आदर्श बनला आहे. कराड तालुका नौसैनिक ग्रुपच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कुटुंबीयांसह नौसैनिकांची उपस्थिती

स्नेहमेळाव्यात विष्णू घाडगे, जयवंत खांडे, शिवाजी धुमाळ, प्रभाकर कुलकर्णी, बी. डी. चिंचकर, राजेश कदम, प्रकाश निकम, गजानन पटवर्धन, अभिजित पटवर्धन, विठ्ठल जाधव, नारायण थोरात, शिवलिंग साबणे, अनिल पाटील यांसारख्या माजी नौसैनिकांनी कुटुंबीयांसह हजेरी लावली.

error: Content is protected !!