सातार्‍यात गरजू पत्रकारांसाठी म्हाडातून घरे : ना. शिवेंद्रसिंहराजे

जिल्हा पत्रकार भवनच्या वास्तूतला पहिला पत्रकार दिन उत्साहात साजरा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीत योगदान देणाऱ्या सातार्‍यातील पत्रकारितेला आदर्श परंपरा आहे. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पत्रकारांसाठी हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी यांनी सूचित केल्यानुसार म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. दरम्यान, जातीय तेढ रोखून सामाजिक सलोखा राखण्यात सातारच्या पत्रकारितेचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गारही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी काढले.

सातारा जिल्हा पत्रकार भवनामध्ये पहिल्यांदाच आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे होते. शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रभारी माहिती उपसंचालक वर्षा पाटोळे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष ओंकार कदम, डिजिटल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारच्या पत्रकारितेला मोठा वारसा आहे. हरिष पाटणे व विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव एकजुटीने काम करत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. सातार्‍यात गरजू व गरीब पत्रकारांसाठी गृहसंकुल उभे करण्याच्या हरिष पाटणे व विनोद कुलकर्णी यांच्या मागणीनुसार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तातडीने जागेचा शोध घ्यावा. प्रकल्पाचा प्रस्ताव दोघांना विचारुन तयार करावा. आपण गरजू व गरीब पत्रकारांना म्हाडामार्फत घरे देण्यासाठी नक्की प्रयत्न करु.

साताऱ्यात संघटनेने सुसज्ज असे सातारा जिल्हा पत्रकार भवन उभे केले आहे. या भवनासाठी आवश्यक त्या बाबींची तरतूद जिल्हा नियोजन समितीमार्फत केली जाईल. शिवाय सातारा नगरपालिका देखभालीचे काम पाहील, असेही ना.शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनीही पत्रकार संरक्षण कायद्याबाबत मांडलेली भावना तसेच पत्रकारांच्या अडचणींसह सर्व विषय मार्गी लावण्यात माझे सहकार्य राहील, असेही ना.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

हरिष पाटणे म्हणाले, सातार्‍यात जिल्हा पत्रकार भवनाची ऐतिहासिक वास्तू आपल्या कारकिर्दीत उभी राहिली, याचा आयुष्यभर अभिमान राहील. पत्रकारांच्या या वास्तूसाठी त्याकाळी एकमेकांच्या विरोधात असलेले दोन्ही राजे एकत्र आले होते, हेही आम्ही कधीच विसरणार नाही. या वास्तूत पहिला पत्रकार दिन होतोय आणि त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून शिवेंद्रराजे उपस्थित आहेत, याचीही इतिहास नोंद ठेवेल. पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्रात सर्वाधिक अधिस्वीकृती कार्ड पुणे विभागात देण्यात आपण यशस्वी झालो आहे. संघटनेचे काम भविष्यातही तेवढ्याच आक्रमकतेने आपण सुरु ठेवू. ना. शिवेंद्रसिंहराजे मंत्री झाल्याने आम्हा त्यांच्या सर्व मित्रांना आपणच मंत्री झाल्याचा आनंद झाला आहे. जिल्हा नियोजन समितीतून पत्रकार भवनाच्या देखभाल दुरुस्तीची कायमस्वरुपी तरतूद ना. शिवेंद्रसिंहराजेंनी करावी. सातार्‍यातील गरजू पत्रकारांसाठी गृहसंकुलाचा प्रकल्प तयार करावा. जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकदिलाने असेच एकत्र रहावे, असेही पाटणे म्हणाले.

विनोद कुलकर्णी म्हणाले, सातार्‍यात आम्ही सर्वांच्या सहकार्याने सातारा जिल्हा पत्रकार भवन उभे करु शकलो. या पत्रकार भवनात यापुढे पत्रकार परिषदा व कार्यक्रम होतील. ना.शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रीपदाचा आम्हा सर्व मित्रांना आनंद आहे. सातार्‍याच्या पत्रकारितेचे व ना.शिवेद्रसिंहराजेंचे अनोखे नाते आहे. ते आणखी वृध्दींगत होईल. सातारा पत्रकार संघाने पहिलाच कार्यक्रम दणक्यात केला. नव्या कार्यकारिणीने आणखी नवनवीन उपक्रम सातत्याने राबवावेत.

पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे प्रास्ताविकात म्हणाले, सातारा पत्रकार संघ व सातारा जिल्हा पत्रकार संघामार्फत पत्रकार हितासाठी उपक्रम राबवले जातील. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच पत्रकारांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सहकार्य करावे.

पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन झाली.यानंतर मान्यवरांचे तसेच नवनिर्वाचित सातारा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांचे सत्कार करण्यात आले. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे मंत्री झाल्याबद्दल पत्रकार संघातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा पत्रकार भवनाच्या संपूर्ण इमारतीची पाहणी केली.

सूत्रसंचालन अरुण जावळे यांनी केले तर आभार अमित वाघमारे यांनी मानले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, तुषार भद्रे, राहूल तपासे, सुजीत आंबेकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्ष उमेश भांबरे, सचिव गजानन चेणगे, खजिनदार अमित वाघमारे, संघटक अजित जगताप, कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत देवरुखकर, अरुण जावळे, मनोज पवार, सचिन काकडे, रिजवान सय्यद, मीना शिंदे, गौरी आवळे तसेच सातार्‍यातील पत्रकार, छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार कॉलनीसाठी जागा उपलब्ध न केल्यास बदली अनिवार्य

सातारा शहराच्या विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या कार्यकाळाचा उल्लेख ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या भाषणात केला. पत्रकार कॉलनीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर पत्रकार कॉलनीसाठी जागा उपलब्ध केली नाही, तर अभिजीत बापट यांची बदली होईल. परंतु त्यांनी पत्रकारांना सहकार्य केल्यास त्यांचा कार्यकाळ साताऱ्यात आणखी पाच वर्षे वाढवला जाईल.” या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. काही पत्रकारांनी बापट यांच्या कामगिरीचे कौतुक करत, “महानगरपालिका होण्याच्या प्रक्रियेनंतर ते आयुक्तपदी येण्यासाठी सक्षम उमेदवार ठरतील,” असे मत व्यक्त केले.

सातारा पत्रकार संघातर्फे गौरव

पत्रकारितेतील मोलाच्या योगदानाबद्दल दैनिक ऐक्यचे उपसंपादक गुरुदास अडागळे यांना नागठाणे विभाग पत्रकार संघाचा शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल त्यांचा सत्कार सातारा पत्रकार संघाच्या वतीने आमदार ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

error: Content is protected !!