साताऱ्यात महसूल सप्ताहाला आजपासून सुरूवात

१ ते ७ ऑगस्टदरम्यान जनहिताचे उपक्रम; नागरिकांनी सहभागी व्हावे : तहसिलदार समीर यादव यांचे आवाहन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : महसूल विभागाच्या वतीने आजपासून सातारा तालुक्यात महसूल सप्ताहाला सुरूवात झाली. १ ऑगस्ट हा राज्यात दरवर्षी महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत विविध जनहिताचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे, महसूल विभागाचे कामकाज पारदर्शक करण्याची दिशा देणे, आणि विभागाविषयी जनविश्वास निर्माण करणे, हे या सप्ताहाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तहसिलदार समीर यादव यांनी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

उपविभागीय अधिकारी आशिष बारकूल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुक्यात महसूल सप्ताहाच्या निमित्ताने दररोज विविध उपक्रम राबवले जात आहेत. या सप्ताहाचा औपचारिक शुभारंभ आज, १ ऑगस्ट रोजी तलाठी निवास येथे करण्यात आला. या प्रसंगी महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

२ ऑगस्ट रोजी २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या आणि पात्र ठरणाऱ्या कुटुंबांना अतिक्रमित जमिनीचे पट्टे वितरित करण्याचा कार्यक्रम होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी पाणंद व शिवरस्त्यांचे मोजमाप करून त्यांना अतिक्रमणमुक्त करण्यात येणार असून, या मार्गांवर वृक्षारोपणाची मोहीमही राबवली जाईल.

४ ऑगस्ट रोजी तालुक्यातील प्रत्येक मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबवले जाणार आहे. ५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान जमा (डीबीटी) करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेटी दिल्या जातील.

६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविणे आणि शासननिर्णयानुसार शर्तभंग प्रकरणांवर निर्णय घेण्यात येणार आहे. महसूल सप्ताहाची सांगता ७ ऑगस्ट रोजी होणार असून, यावेळी एम-सॅण्ड धोरणाची अंमलबजावणी व नवीन कार्यप्रणालींची अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम पार पडेल.

दरम्यान, महसूल सप्ताहाच्या माध्यमातून विभागाने प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद मजबूत करण्यासह योजनांचा थेट लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.

error: Content is protected !!