गोरक्षकांचा छळ थांबवा; अवैध गोशाळांवर कारवाई करा

कुरेशी समाज संघर्ष समितीची मागणी, प्रशासनाला निवेदन सादर

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात गोरक्षक कार्यकर्ते आणि तथाकथित गोरक्षण संस्थांकडून कुरेशी समाजाच्या व्यावसायिकांवर खोट्या गुन्ह्यांच्या माध्यमातून अन्याय केला जात असून, धमक्या, हिंसाचार आणि कायद्याचा गैरवापर वाढत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले.

हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना समितीचे जिल्हाध्यक्ष सादिक भाई बेपारी यांच्या नेतृत्वाखाली दिले गेले. यावेळी समितीचे सुमारे दोनशे सदस्य उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तथाकथित गोरक्षक कार्यकर्ते, स्थानिक पोलीस आणि पशुसंवर्धन अधिकारी कुरेशी समाजाच्या लोकांना विविध सबबींवरून त्रास देतात. या प्रकारामुळे संपूर्ण समाज आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दडपणाखाली आहे. महाराष्ट्रात साठ लाखांहून अधिक लोक या व्यवसायावर अवलंबून असून, यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे. भाकड जनावरांच्या व्यवस्थेबाबत शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

समाजाच्या मागण्या स्पष्ट असून, प्रत्येक जनावरासाठी पशुवैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करावे, जिल्ह्यात अधिकृत कत्तलखाने, जनावरांचे बाजार, दुकाने आणि कोंडवाडा उभारण्यात यावा, तसेच अवैध गोरक्षण संस्था आणि तथाकथित गोरक्षकांवर कठोर आणि तातडीने कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या मागण्या मान्य न झाल्यास कुरेशी समाजाचा संप सुरूच राहणार असून, या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची गैरसोय होईल, तरीही आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहनही संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!