नफा, भत्ते, वेतनातून उभारली मदतीची रक्कम

मुंबई, (भूमिशिल्प वृत्तसेवा): राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेसमोर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समाजाभिमुख भूमिका निभावत पुढे सरसावली आहे. आज, मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी एकूण १ कोटी २२ लाख ५६ हजार रुपयांचा धनादेश बँकेच्या वतीने सुपूर्द करण्यात आला.
राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने मोठा हाहाकार माजविला असून शेतजमिनी, घरे, पिके आणि जनजीवन यावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सहकार क्षेत्रातील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध संकटांना हातभार लावते. त्याचाच परिणाम आजही दिसून आला. बँकेच्या नफ्यातून १ कोटी रुपये, संचालक मंडळाच्या भत्त्यातून व कर्मचाऱ्यांच्या पगारातून २२ लाख ५६ हजार रुपये अशा एकूण १ कोटी २२ लाख ५६ हजार रुपयांची मदत राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकरी व जनतेसाठी समर्पित करण्यात आली आहे.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, तसेच संचालक राजुशेठ राजपुरे , प्रदीप विधाते उपस्थित होते.
यावेळी बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील म्हणाले, अशा संकटसमयी प्रत्येक जबाबदार नागरिकाने शक्य ती मदत करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. सरकार आपली जबाबदारी पार पाडत असतानाच, नागरिक म्हणून आपणदेखील पुढे येऊन हातभार लावणे गरजेचे आहे. आमच्या या छोट्याशा प्रयत्नातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, हीच मनापासून इच्छा आहे.
दरम्यान, सहकार क्षेत्रातून आलेला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा हा पुढाकार राज्यातील इतर बँका आणि संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त होत असून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

You must be logged in to post a comment.