सातारा पोलिसांची तांत्रिक कौशल्याने मोठी कामगिरी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक कौशल्याचा उत्तम वापर करत वेगवेगळ्या घटनांमध्ये गहाळ झालेल्या एकूण नऊ लाख रुपयांचे ४१ मोबाईल फोन हस्तगत करण्यास यश मिळवले आहे. सीआयआर (CIR) पोर्टल आणि इतर तांत्रिक माध्यमांचा वापर करून विविध जिल्ह्यांमधून आणि परराज्यांतून हे मोबाईल शोधून काढण्यात आले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेची आखणी करण्यात आली होती. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला.
गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तांत्रिक विश्लेषण, सीआयआर पोर्टलचा वापर, मोबाईल टॉवर लोकेशन तपासणी, आणि अन्य आधुनिक पद्धतींचा अवलंब करत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातूनही मोबाईल्सचा तपास केला. अखेर न्यायालयीन परवानगी घेऊन हे मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
दरम्यान, ही कारवाई केवळ पोलिसांची कार्यक्षमता नव्हे, तर सामान्य जनतेप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि जबाबदारीचे उदाहरण ठरली आहे. गहाळ मोबाईल परत मिळवणाऱ्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, तसेच पोलीस हवालदार सुजित भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, विशाल धुमाळ, संतोष घाडगे, सागर गायकवाड, मच्छिंद्र माने, सुशांत कदम, महेश पवार, ओंकार डुबल, प्रशांत मोरे आदी कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

You must be logged in to post a comment.