सातारची जनता बँक लवकरच पुण्यात : विनोद कुलकर्णी

६२ वर्षांनंतर जिल्ह्याच्या सीमापार विस्तार; रिझर्व्ह बँकेची मंजुरी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची विश्वासू संस्था म्हणून लौकिक प्राप्त जनता सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार आता जिल्ह्याच्या सीमापार होऊन प्रथमच पुण्यात होत आहे. या विस्ताराला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंजुरी दिली असून, येत्या वर्षभरात बँकेची शाखा पुणे जिल्ह्यात सुरू होणार आहे. अशी माहिती भागधारक पॅनेल प्रमुख, जेष्ठ संचालक व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री.कुलकर्णी म्हणाले, जनता सहकारी बँकेच्या २०२३ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भागधारक पॅनेलने सभासदांना ‘जनता बँक वाचवली, टिकवली व आता वाढविणे’ अशी हमी दिली होती. त्यानुसार कार्यक्षेत्र विस्तारासाठी सहकार आयुक्त व रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यास नुकतीच अंतिम मंजुरी मिळाली आहे. चेअरमन अमोल मोहिते यांनी दोन वर्षांत गतिमान व पारदर्शक कारभारातून बँकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले. सलग दोन आर्थिक वर्षे रिझर्व्ह बँकेचे निकष पूर्ण केले असून, प्रथमच बँकेचा एन.पी.ए. शून्य टक्क्यांवर आणण्यात यश आले आहे. लवकरच मोबाईल बँकिंग सेवा सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बँकेच्या यशामागे सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांचा विश्वास, तसेच अधिकारी व सेवक वर्गाची मोलाची साथ असल्याचे संचालक मंडळाने नमूद केले. पुण्यातील शाखा सुरू झाल्यामुळे तेथील सातारकरांना बँकिंग सेवा अधिक सुलभ होणार असून ग्राहक वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

यावेळी चेअरमन अमोल मोहिते, उपाध्यक्ष विजय बडेकर, जेष्ठ संचालिका डॉ. चेतना माजगांवकर, संचालक जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण, आनंदराव कणसे, अशोक मोने, माधव सारडा, सौ. सुजाता राजेमहाडिक, चंद्रशेखर घोडके, अविनाश बाचल, रविंद्र माने, रामचंद्र साठे, वसंत लेवे, बाळासाहेब गोसावी, वजीर नदाफ, नारायण लोहार, ॲड. चंद्रकांत बेबले, अक्षय गवळी, मच्छिंद्र जगदाळे, तज्ञ संचालक सौरभ रायरीकर (सी.ए.), राजेंद्र जाधव (सी.ए.), सेवक संचालक निळकंठ सुर्ले, शिवाजीराव भोसले, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य विनय नागर (टॅक्स कन्सल्टंट), पंकज भोसले (सी.ए.), ॲड. श्रुती कदम, जनता बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष उमेश साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!