साताऱ्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

ज्येष्ठांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस यंत्रणा उभारण्याची मागणी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ असून त्यांच्या सन्मान, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासनाने जाहीर केलेले धोरण प्रभावीपणे राबवले गेले पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी साताऱ्यात केली.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त साताऱ्यातील सामाजिक न्याय भवन येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संपतराव भोसले आणि महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघाचे उपाध्यक्ष आनंदराव शिंदे उपस्थित होते.

दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे श्री. भोसले यांनी खाजगी दवाखान्यांमध्ये ज्येष्ठांना ५० टक्के सवलत, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व रुग्णालयांमध्ये लागू करावी, अशी मागणी केली. तर श्री. शिंदे यांनी ग्रामपंचायत पातळीवर ज्येष्ठ समित्या स्थापन करून त्यांच्या मासिक बैठकीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका स्पष्ट केली.

ज्येष्ठांच्या आरोग्य तपासणीसाठी समाजकल्याण विभाग आणि क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबीर आयोजित करण्यात आले. डॉ. प्रमा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन आदी तपासण्या पार पडल्या.

अध्यक्षीय भाषणात उमेश घुले यांनी, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विभाग नेहमीच तत्पर राहील. त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाला समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय देशपांडे, अण्णा वायदंडे, पत्रकार मुकुंद काकडे तसेच सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार्थी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!