अदानीच्या स्मार्ट मीटरला सुशांत मोरे यांचा झटका!

साताऱ्यात स्मार्ट मीटर जोडणीचे काम स्थगित; महावितरणने दिले लेखी पत्र

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात अदानी कंपनीमार्फत सुरू असलेले स्मार्ट मीटर बसविण्याचे काम अखेर स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक, माहिती अधिकार आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि आंदोलनाला यश आले असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे स्मार्ट मीटर जोडणीचे काम थांबवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबवण्याचे आदेश दिलेले असतानाही सातारा जिल्ह्यात अदानी एनर्जी सोल्युशन, अहमदाबाद या कंपनीमार्फत काम सुरूच होते. याविरोधात सुशांत मोरे यांनी ७ एप्रिल रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. त्याआधी जिल्हाधिकारी आणि महावितरणकडे निवेदनही देण्यात आले होते.

या इशाऱ्याची दखल घेत महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांनी स्मार्ट मीटर जोडणीचे काम थांबवण्यात आल्याचे स्पष्ट करत एक लेखी पत्र सादर केले. तसेच, ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करण्यात येत नसून, ग्राहकाच्या मागणीनुसारच केवळ बंद पडलेले मीटर बदलण्यात येत असल्याचेही नमूद केले.

दरम्यान, या निर्णयामुळे श्री. मोरे यांच्या आणखी एका आंदोलनाला यश मिळाले असून, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!