प्रवासी व मालवाहतूक वाहनांसाठी ‘एमएच-११ डिव्ही’ मालिका ७ एप्रिलपासून सुरू

आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करा, सातारा आरटीओचे नागरिकांना आवाहन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्रवासी व मालवाहतूक चारचाकी वाहनांसाठी ‘एमएच-११ डिव्ही ०००१’ ते ‘एमएच-११ डिव्ही ९९९९’ या नवीन नोंदणी क्रमांक मालिकेची प्रक्रिया सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात ७ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे. ही मालिका संगणकीय ‘वाहन ४.०’ प्रणालीद्वारे सुरु करण्यात येत असून, वाहनधारकांना शासकीय नियमानुसार शुल्क भरून पसंतीचे आकर्षक क्रमांक आरक्षित करता येणार आहेत.

या मालिकेतील क्रमांक मुख्यत्वे प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी असले तरी इतर प्रकारच्या वाहनांसाठीही तो हवा असल्यास तिप्पट शुल्क भरून तो क्रमांक घेता येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत एलएमव्ही (चारचाकी) वाहनधारकांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. ज्या क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त होईल, त्या अर्जदारास संबंधित क्रमांक तत्काळ देण्यात येईल. मात्र, एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास, ८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात अधिक रकमेचे धनाकर्ष सादर करावे लागेल. सर्वाधिक रक्कम भरलेला अर्जदार पसंतीचा क्रमांक मिळवेल. उर्वरित अर्जदारांचे धनाकर्ष त्वरित परत केले जातील.

क्रमांक आरक्षित केल्यानंतर १८० दिवसांच्या आत संबंधित वाहनाची नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा आरक्षित क्रमांक रद्द करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे पार पडणार असून, इच्छुक वाहनधारकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

error: Content is protected !!