गर्भपात प्रकरणाच्या तपासात ढिलाई; तेलतुंबडे यांची बढती थांबवा

माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांची पत्रकार परिषदेत मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): नागठाणे येथील गर्भपात प्रकरणाच्या तपासात गंभीर त्रुटी केल्याचा आरोप करत बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांची पदोन्नती तात्काळ थांबवावी, अशी मागणी मीरा-भाईंदर नगरपालिकेचे माजी नगरसेवक व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, रवींद्र तेलतुंबडे यांनी ७ मार्च २०२३ रोजी नागठाणेतील डॉक्टर विकास घाडगे व डॉक्टर मेधा घाडगे यांच्या अंनैतिक गर्भपात प्रकरणात पोलीस रिमांड घेण्याऐवजी न्यायालयीन कोठडीची शिफारस केली. त्यानंतर ८ मार्च रोजी त्यांनी लेखी पत्राद्वारे न्यायालयास आरोपीस अटींसह मुक्त करण्याची विनंती केली. हे वर्तन तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेशी विसंगत असून, यामुळे आरोपींना मदतीचा फायदा मिळाला.

पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, आरोपीविरोधातील तपास अपूर्ण असूनही रवींद्र तेलतुंबडे यांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. “या प्रकारामुळे महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा गालबोट लागतो. आरोपींना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्यास सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास ढासळेल, असे ते म्हणाले.

तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे या प्रकरणाबाबत तक्रार देण्यात आली होती. मात्र, कोणतीही चौकशी किंवा कारवाई न होता तेलतुंबडे यांना बढती मिळाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याचे पवार यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत रवींद्र तेलतुंबडे यांची पदोन्नती थांबवावी आणि या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी स्पष्ट मागणी पवार यांनी केली.

error: Content is protected !!