२०व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळाव्याचे शानदार उद्घाटन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा ही केवळ स्पर्धा नसून, पोलिस दलाच्या कर्तव्यकुशलतेचा प्रात्यक्षिक अविष्कार आहे. या मेळाव्यातून महाराष्ट्राला पुन्हा एकदा ‘गोल्ड मेडल’ मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला. साताऱ्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या २०व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
उद्घाटन सत्रात जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, पोलिस अधिकारी व कर्मचारी केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत, तर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास कौशल्य, पुरावा संकलन, आणि पथक भावना यासारख्या बाबींमध्येही त्यांची कसोटी लागते. अशा कौशल्यांना धार देण्यासाठी कर्तव्य मेळावे उपयुक्त ठरतात.
ते पुढे म्हणाले, इन्व्हेस्टिगेशन स्किल, इव्हिडन्स कलेक्शन, डिटेक्शनचा रेपो आणि कन्व्हेन्शन रेट सुधारण्यासाठी या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरतात. यामध्ये सहभागी होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना संघभावना निर्माण करण्याची आणि एकमेकांकडून शिकण्याची संधी मिळते. यामुळे त्यांच्या रोजच्या कर्तव्यातही गुणवत्ता वाढते.
या मेळाव्याचे उत्तम नियोजन पोलिस अधीक्षक तुषार दोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले असून, ५ ते ८ ऑगस्ट दरम्यान चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांचे पोलिस दल सहभागी झाले आहेत. स्पर्धांमध्ये फॉरेन्सिक सायन्स रिटन टेस्ट, क्रिमिनल लॉ रिटन टेस्ट, ऑफिसर फोटोग्राफी, ग्राउंड सर्च, वाहन तपासणी, तत्काळ शोध कारवाई अशा विविध कसोटींचा समावेश आहे. प्रत्येक दिवशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या सत्रांमध्ये स्पर्धा घेतल्या जात आहेत.
या स्पर्धेच्या सांगता समारंभासाठी परिक्षेत्रीय पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी पाटील यांनी या स्पर्धेद्वारे महाराष्ट्र पोलिस दल पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर ‘गोल्ड मेडल’चे मानकरी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

You must be logged in to post a comment.