नियम मोडले… निष्पाप जीव गेला!

टेम्पो चालकास तीन वर्षांची सक्तमजुरी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : रस्त्यावर कोणतीही सुरक्षिततेची खबरदारी न घेता, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने टेम्पो उभा केल्यामुळे एका तरुण सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने टेम्पो चालकास दोषी ठरवले आहे. या प्रकरणी आरोपीस तीन वर्षांची साधी कैद आणि एकूण ४,२०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद शं. वाघमारे यांनी हा निकाल दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित प्रकरणातील आरोपी अविनाश शंकर पवार ( रा. पंताचा गोट, रविवार पेठ, सातारा) याने ३१ ऑगस्ट २०१६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आकाशवाणी झोपडपट्टीकडून महानुभव मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपला टेम्पो (एम.एच. ११ बी.एल. ५८६५) अत्यंत निष्काळजीपणे उभा केला होता. टेम्पोमध्ये नविन पत्र्यांची पाने तब्बल ६ ते ७ फूट बाहेर आलेला असतानाही कोणतीही सूचना फलक, सिग्नल, रिफ्लेक्टर किंवा प्रकाश व्यवस्था लावण्यात आलेली नव्हती. विशेष म्हणजे टेम्पोच्या लाईटही बंद अवस्थेत होत्या आणि वाहन थेट रस्त्याच्या मध्यभागी उभे करण्यात आले होते.

याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या आकाश विजय विभूते (वय २०, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) या तरुण सायकलस्वाराची टेम्पोला जोरदार धडक बसली. या अपघातात आकाश विभूते यांना गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात हयगयने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. डी. देवकाते यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनुराधा शंकर निंबाळकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयासमोर सात साक्षीदारांची साक्ष, प्रत्यक्षदर्शी पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायनिर्णयांचे संदर्भ सादर करण्यात आले.

सर्व बाबी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी अविनाश पवार याला भारतीय दंड संहिता कलमान्वये तीन वर्षांची साधी कैद व ३,००० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला असून एकूण दंडाची रक्कम ४,२०० रुपये आहे.

या खटल्यात सरकारी बाजूची प्रभावी पैरवी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्ही. बी. ढमाळ व पोलीस कॉन्स्टेबल डी. जी. घाडगे यांनी केली.

फ्लेक्स-मंडप साहित्याची बेदरकार वाहतूक ठरतेय जीवघेणी

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीचा मंडप व फ्लेक्स लावण्याचा व्यवसाय असून अशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने माल वाहतूक करणारे अनेक टेम्पो शहरात सर्रास आढळतात. अनेकदा पानफळ्या (लांब पत्रे), लोखंडी फ्रेम, फ्लेक्सचे साहित्य रस्त्याच्या पलीकडे बाहेर आलेल्या अवस्थेत कोणतीही सुरक्षितता न पाळता वाहून नेले जाते. या प्रकारामुळे यापूर्वीही अपघात होऊन नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एखादा जीव गेल्यानंतरच कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत असून अशा नियमबाह्य वाहतुकीवर वेळीच अंकुश ठेवण्याची गरज या निकालातून अधोरेखित झाली आहे.

साताऱ्यात नियमबाह्य वाहतूक ठरतेय जीवघेणी; कारवाई कधी? उद्या सविस्तर वाचा!

याप्रकरणी २१ फेब्रुवारी रोजी ‘भूमिशिल्प’ ने आवाज उठवणारी बातमी प्रसिद्ध केली होती. संबंधित बातमीची लिंक खाली देत आहे.

धोकादायक वाहतूक थांबवा.! की निष्पापांचा बळी घेतल्यावरच जाग येणार?

error: Content is protected !!