सातारकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या मंडप-फ्लेक्स वाहतुकीकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्यात जयंती, वाढदिवस, राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरभर मंडप व फ्लेक्स लावण्याचे काम जोमात सुरू आहे. मात्र, या कामासाठी लागणाऱ्या लांबट बांबू, लोखंडी कैच्या, वासे आणि इतर साहित्याची वाहतूक अतिशय धोकादायक पद्धतीने केली जात आहे. लहान चारचाकी गाड्यांमधून रस्त्यातून कधीही कुठेही अडथळा निर्माण करत ही वाहतूक सुरू असते, पण पोलिस प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बघ्याची भूमिका घेत आहे.
साताऱ्यात मुख्यतः दोनच प्रमुख रस्ते असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. या रस्त्यांवरील फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून, बेकायदेशीर बांधकामे आणि अपुऱ्या पार्किंगच्या सुविधेमुळे पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.याशिवाय, अवजड वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते, त्यामुळे सातारकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
त्यातच, बांबू, लोखंडी कैच्या, वासे यांसारख्या लांबट वस्तू छोट्या वाहनांमधून वाहून नेल्या जात असल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण होतो. या बेजबाबदार वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जर अशा परिस्थितीत एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून शहरभर ही वाहतूक निर्धास्त सुरू असताना, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नियम धाब्यावर बसवून शहरभर फिरणाऱ्या या गाड्यांवर कारवाई का केली जात नाही? कोणाचा तरी निष्पाप बळी गेल्यावरच पोलिसांना जाग येणार का? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सातारा वाहतूक पोलिसांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अन्यथा बेफिकीर प्रशासनामुळे होणाऱ्या संभाव्य दुर्घटनांची जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

You must be logged in to post a comment.