विजयादशमीनिमित्तच्या साताऱ्यातील प्रथेबाबत मंडळांसह प्रशासनाने घ्यावी दक्षता
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरात विजयादशमीनिमित्त काही मानाच्या मंडळांच्या दुर्गादेवी मूर्तींच्या भेटीचा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र या भेट सोहळ्याचे नियोजनात संबंधित मंडळांसह प्रशासनाने सुसूत्रता आणणे तसेच योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. श्रद्धेचा भाग असला तरी योग्य ती दक्षता न घेणे अनेकांच्या जीवावर बेतू शकते, त्या दृष्टीने सुरक्षिततेचे नियम अवलंबणे आणि या प्रथेमध्ये सर्वांच्या सूचनांचा विचार करून योग्य ते बदल करावेत, अशी अपेक्षा जागरूक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सातारा शहरात गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अनेक मंडळांनी मोठ्या उंचीच्या मूर्ती बसवणे हा प्रतिष्ठेचा विषय केल्याचे दिसून येत आहे. दसऱ्या दिवशी मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांवेळी मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाच्या “आईसाहेब” या मानाच्या दुर्गामूर्तीस अन्य विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून ओटी भरणे व पुष्पवर्षाव करून भेटीचा कार्यक्रम होत असतो. त्यामध्ये सदर बझार येथील भारत माता मंडळाच्या मानाच्या देवीचे भेटणे हा मुख्य सोहळा असतो. राजपथावर देवी चौक ते कमानी हौदा दरम्यान हा भेटीचा सोहळा संपन्न होतो. मात्र मुळातच हा रस्ता दोन्ही बाजूंनी येणाऱ्या शोभायात्रांसाठी अपुरा आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणांसह फुटपाथवर दुचाकी व चारचाकी वाहने लावलेली असतात. यावेळी मोठ्या संख्येने देवींच्या भेटीचा कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे योग्य नियोजन होत नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. मुळातच हा भेटीचा सोहळा रस्त्यावर होण्याऐवजी राजवाड्यासमोरील गांधी मैदानात संपन्न झाल्यास अनेक प्रश्न आपोआप सुटणार आहेत. याशिवाय अन्य मैदानांचा किंवा प्रशस्त जागांचा विचार संबंधित मंडळांसह प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन करावा, अशीही नागरिकांची चर्चा आहे.
नव्याने सुरू होत असलेल्या काही प्रथा हा श्रद्धेचा व भावनेचा प्रश्न असला तरी भेट सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या आबालवृद्धांच्या सुरक्षिततेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. देवी हे शक्ती व भक्तीचे प्रतीक आहे. नवरात्र काळात अनेक महिलांचे नऊ दिवसांचे उपवास असतात. त्यातून विजयादशमीची पालखी मिरवणूक तसेच दुर्गा मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक पाहणे आणि त्यात सहभागी होणे, हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याची परवानगी असल्याने त्यावेळेपर्यंत ढोल ताशांच्या पथकांचा निनाद सुरू असतो. त्यानंतर वाद्यांऐवजी फटाक्यांची आतीषबाजी केली जाते. मात्र त्याबाबतही सुरक्षिततेचे कोणतेही नियम मंडळांकडून पाळले जाताना दिसत नाहीत. तसेच महिला, मुली व वृद्ध लोकांसाठी गर्दी व्यवस्थापनामध्ये कोणतीही दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही.
रस्त्याकडेला दुचाकी व चारचाकी वाहने तशीच लावलेली असतात. ती काढण्याबाबत वाहतूक शाखेने संबंधितांना सूचना देणे गरजेचे असते. कालच्या मिरवणुकीवेळी काही हुल्लडबाजांनी केलेल्या रेटारेटीतून देवी चौक बस स्टॉपसमोर लावलेल्या दुचाकींत अडकून काही महिला व मुली जखमीसुद्धा झाल्या आहेत. देवीच्या मिरवणुकीत जर देवींचे प्रतीक असणाऱ्या महिलांची गैरसोय होत असेल तर हे गंभीरच आहे. त्यामुळे शिस्तबद्धरित्या मिरवणूक काढणे, फटाक्यांच्या आतषबाजीला नियम घालून देणे गरजेचे आहे.
चेंगराचेंगरीसारखे प्रकार टाळले पाहिजेत, या दृष्टीने गडबड गोंधळ करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक असून मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या शोभायात्रे पाठीमागे सुसज्ज अग्निशमन दल,ॲम्बुलन्स व डॉक्टरांसह अत्यावश्यक सेवा उपलब्ध ठेवणेही आवश्यक आहे. गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला व मुलींची छेडछाड करणारे सडकसख्याहरी, तसेच मोबाईल, पैशाची पाकिटे व मौल्यवान दागिने लंपास करणारे पाकीटमार यांच्यावरही नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पोलीस यंत्रणा सतर्क असणे आवश्यक असून पोलीस, होमगार्ड व संबंधित मंडळांचे स्वयंसेवक यांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.चेंगराचेंगरी होणार नाही, यासाठी दक्षता घेणे आणि लहान मुले, महिला, रुग्ण व वृद्ध लोकांनी गर्दीमध्ये जाणे टाळल्यास कोणताही अघटीत प्रकार घडू शकणार नाही. दरम्यान, देवींच्या भेटीचा मुख्य सोहळा राजवाड्यासारख्या किंवा जिल्हा परिषद मैदान, तालीम संघ मैदान, कोटेश्वर मैदान अशा ठिकाणी ठेवल्यास त्यामुळे वाहतुकीची कोंडी तसेच गर्दीचा प्रश्न उद्भवणार नाही. याशिवाय एलईडी स्क्रीन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच फेसबुक लाईव्ह सारख्या यंत्रणेचा वापर करून ठिकठिकाणी हा भेटसोहळा घरबसल्या किंवा गर्दी नसलेल्या ठिकाणी पाहणे भाविकांना शक्य होईल.
भेटीच्या वेळी उधळल्या जाणाऱ्या गुलाल व प्लास्टिकच्या कागदाचे तुकडे यावरही नियंत्रण असणे गरजेचे आहे. गुलालाची हवेतील उधळण आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. साताऱ्यातील एका युवकाचा मध्यंतरी रत्नागिरी येथे गुलालाच्या हवेतील उधळणीने श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. या व अशा अनेक घटनांचा सारासार विचार करून चेंगराचेंगरी टाळणे व भेट सोहळ्याला शिस्तबद्धतेचा मानदंड देण्याबाबत नगरपालिका, पोलीस प्रशासन व संबंधित मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समाजातील जागृत घटकांनी सारासार विचार करायला हवा.
देवींचा भेट सोहळा ही बाब श्रद्धेची असली तरी त्यामध्ये काळानुरूप बदल करणे व सुरक्षिततेचा विचार करून त्यास सर्वानुमते मान्यता देणे आवश्यक आहे.
बैठक घेऊन मार्ग काढणार : नितीन चव्हाण
देवींच्या भेटीचा सोहळा सुरक्षित व अन्य ठिकाणी व्हावा यासाठी भारतमाता व प्रतापसिंह मंडळ यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक यापूर्वीही झाली होती व लवकरच प्रशासनाशी चर्चा करून योग्य मार्ग काढू, व भाविक व दर्शकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊ ,अशी प्रतिक्रिया सदर बझार येथील भारतमाता मंडळाचे अध्यक्ष नितीन चव्हाण यांनी ‘भूमिशिल्प’शी बोलताना व्यक्त केली आहे.
You must be logged in to post a comment.