रस्त्यासाठी वन विभागाकडून जागा मंजूर; ना.मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

महाबळेश्वर, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पर्यटकांनी गजबजलेल्या महाबळेश्वर परिसरातील वाहतूक कोंडीचा दीर्घकालीन प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलादपूर–सुरूर या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आणि पेट्रीट–वेण्णा लेक (बाह्यवळण मार्ग) निर्मितीसाठी वन विभागाने ०.७८ हेक्टर (७८ गुंठे) जमीन रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी मंजूर दिली आहे. या निर्णयामुळे येथील वाहतूक सुलभ होणार असून, पर्यटक व स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा रस्ता महाबळेश्वर, पाचगणी, वाई तसेच कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. परंतु रस्ता अरुंद असल्याने सुट्ट्यांच्या काळात आणि पर्यटन हंगामात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्याचबरोबर अपघातांची संख्याही वाढत होती. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्याची गरज होती.मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामास गती मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून संबंधित अडचणी सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर वन विभागाने मंजुरी दिल्याने रस्त्याच्या कामास हिरवा कंदील मिळाला आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रदूषणात घट, तसेच पर्यटकांची संख्या वाढण्यासोबतच स्थानिकांच्या व्यवसाय व रोजगाराच्या संधीही वाढतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

You must be logged in to post a comment.