तुषार भद्रे हे मराठी रंगभूमीचे मिशनरी रंगधर्मी : किशोर बेडकिहाळ

५० वर्षांच्या अविरत रंगसेवेसाठी ‘सुवर्णयुग रंगसेवेचे’ गौरव सोहळा साताऱ्यात उत्साहात

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): तुषार भद्रे हे केवळ एक रंगकर्मी नाहीत, तर मराठी रंगभूमीचे मिशनरी रंगधर्मी आहेत. त्यांनी वैयक्तिक करिअर आणि लाभ यांच्या पलीकडे जाऊन तन-मन-धन अर्पण करून साताऱ्यासह महाराष्ट्राच्या रंगमंचीय विश्वात भरीव कामगिरी केली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांच्या बहुआयामी रंगप्रवासाचा गौरव केला.

मराठी रंगभूमीवरील सततचा शोध, नवनवीन प्रयोग, सामाजिक बांधिलकी आणि विचारांची ताकद यामुळे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे तुषार भद्रे आपल्या नाट्यप्रवासाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने ‘सुवर्णयुग रंगसेवेचे’ हा विशेष गौरव सत्कार सोहळा प्रमिती संस्थेच्या वतीने नुकताच साताऱ्यात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वतः किशोर बेडकिहाळ यांनी भूषविले. सोहळ्यात भद्रे यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

किशोर बेडकिहाळ यांनी प्रास्ताविकात तुषार भद्रे यांच्या दिग्दर्शन, अभिनय, लेखन, नवनवीन संकल्पना, सामाजिक विषयांवरील नाटके, तरुण कलाकारांना मार्गदर्शन या सर्व क्षेत्रातील मोलाच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की तुषार भद्रे यांनी रंगभूमी या समाजाशी नातं सांगणाऱ्या माध्यमाला नवे आयाम दिले. ग्रामीण, प्रायोगिक, पारंपरिक, समकालीन तसेच भारतीय आणि पाश्चिमात्य नाट्यप्रकारांचा सातत्याने अभ्यास करून त्यांनी लोकाभिमुख रंगभूमीसाठी नवे प्रयोग साकारले. ‘शिपान’, ‘भाकवान’, ‘गजर’, ‘कारान’, ‘लादेनच्या शोधात’, ‘भेट’, ‘सर्जी’, ‘कावदान’, ‘ॲज पेल ॲज डेथ’, ‘दौरा’, ‘क्रांतीपर्व’ या नाटकांपासून ते खेळ सारख्या पथनाट्यांपर्यंत त्यांनी प्रेक्षकांना अस्वस्थ करणारे, विचार करायला लावणारे प्रश्न विचारले.

सत्काराला उत्तर देताना तुषार भद्रे म्हणाले, मी नाट्यमाध्यमात स्वतःला वजा करून चळवळ म्हणून कार्य केले आहे. नाटक ही जाणीवपूर्वक आणि गांभीर्याने साकार करण्याची कला आहे. दिलीप आंबेकर यांनी मला रंगभूमीवर आणले, तर सुनील कुलकर्णी गुरूंनी योग्य दिशा दाखविली. माझा ५० वर्षांचा नाट्यप्रवास हा माझ्या सहकारी रंगकर्मी आणि विद्यार्थ्यांचा सहप्रवास आहे. त्यांनी पुढे सांगितले की, ५० हजार विद्यार्थी घडविण्याचे आपले ध्येय असून येत्या वर्षभरात किमान चार ग्रंथांचे लेखन करून भावी रंगकर्म्यांसाठी ते होकायंत्र ठरवतील. “आता मी एका डिक्शनरीसारखा आहे; ज्याला जे नाट्यसंदर्भ हवेत ते देण्याचा प्रयत्न करेन,” अशी हमी त्यांनी दिली. तसेच या सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध नाट्यविषयक कार्यक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमात तुषार भद्रे यांच्या ५० वर्षांच्या नाट्यप्रवासावर आधारित छायाचित्र आणि महाराष्ट्रातील नामवंत रंगकर्मींची प्रतिक्रिया असलेली चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. सहकलाकार, विद्यार्थी आणि हितचिंतकांनी त्यांच्या कार्याबद्दलची मनोगते व्यक्त केली. ‘तुमचा हा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. रंगभूमीसाठी तुमचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगे आहे,’ अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

समारंभाचे सूत्रसंचलन दीपक कुलकर्णी यांनी केले. मानपत्राचे वाचन अमित देशमुख यांनी तर लेखन राजीव मुळ्ये यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. आदिती काळमेख, सचिन प्रभुणे, बाळासाहेब कचरे, चित्रकार सागरनाथ गायकवाड, अमित काळमेख, राजेश नारकर, लता चव्हाण, बाबा भोरे यांनी परिश्रम घेतले.

या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या वर्षा देशपांडे, ज्येष्ठ वक्ते प्रा. श्रीधर साळुंखे तसेच चित्रकार, कवी, साहित्यिक, रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!