ना. शिवेंद्रसिंहराजे; करहर येथे विठ्ठलचरणी केली प्रार्थना

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहर ता. जावली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठुरायाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. जनतेला सुखी आणि समृद्ध ठेव अशी प्रार्थना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी विठ्ठलचरणी केली.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी! या उत्सवानिमित्त दरवर्षी प्रतीपंढरपूर अशी ख्याती असलेल्या करहर येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करहरनगरीत विठुरायाची महापूजा भक्तीभावाने संपन्न झाली. करहर येथील विठ्ठल मंदिरात सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ही महापूजा पार पडली. यावेळी करहर येथील तीन वारकरी दाम्पंत्यांनाही विठुरायाच्या पुजेचा मान देण्यात आला. यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत आ. शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंतराव मानकुमरे, प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, तहसीलदार हणमंत कोळेकर, करहरच्या सरपंच सौ. सोनाली यादव, प्रसाद यादव, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विठुरायाच्या पूजेनंतर मंदिरात भाविक- भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य लाभो अशी प्रार्थना विठ्ठल- रुक्मिणी चरणी केली. तसेच तमाम विठ्ठलभक्त आणि वारकरी बंधू- भगिनींना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

You must be logged in to post a comment.