सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी १२५ कोटींच्या निधीला मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; नायगावचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार

खंडाळा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त नायगाव (ता. खंडाळा) येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी १२५ कोटी रुपये निधी मंजूर केल्याची घोषणा केली. सावित्रीबाईंच्या द्विशताब्दी वर्षापूर्वी स्मारकाचे काम वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त नायगाव, ता. खंडाळा येथे आयोजित सावित्रीमाई जयंती उत्सवास प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार सर्वश्री छगन भुजबळ, अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले आदी मान्यवर उपस्थित होते.

ना.फडणवीस म्हणाले, “स्मारक केवळ एक पुतळा न राहता, विचारांचे स्मारक म्हणून ते ओळखले जाईल. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर करण्यासाठी हे स्मारक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे केंद्र ठरेल.” स्मारकासाठी १० एकर जमिनीचे अधिग्रहण लवकरच पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

महिला सक्षमीकरणावर भर

महिलांसाठी सक्षमीकरणाच्या योजनांवर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “महिला सक्षमीकरणासाठी शासनाने ३३% आरक्षण लागू केले आहे. याशिवाय, लखपतीदीदी योजनेच्या माध्यमातून पुढील दोन-तीन वर्षांत ५० लाख महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.” सावित्रीबाईंच्या कार्याचा आदर्श घेत महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामविकास मंत्र्यांकडून नायगाव दत्तक

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नायगाव गाव दत्तक घेत असल्याची घोषणा करत सांगितले की, “स्मारकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. स्मारकाच्या परिसरात महिलांसाठी प्रशिक्षण आणि उद्योजकता विकास केंद्र उभारले जाईल.

”स्मारकाचा आराखडा सादर

कार्यक्रमादरम्यान स्मारकाचा आराखडा सादर करण्यात आला. स्मारक परिसरात शासकीय प्रतीक्षालय, वॉटर एटीएम, महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण केंद्र आणि महाज्योतीच्या योजनांचे प्रदर्शन उभारण्यात येणार आहे.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

यावेळी सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि कार्य यावर भाष्य करत अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. आमदार छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले पुरस्कार नायगाव येथील कार्यक्रमात वितरित करण्याची मागणी केली.

कार्यक्रमास विविध मंत्री, आमदार, अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायगावला आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार सर्व मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

error: Content is protected !!