मैत्रेयी जमदाडेचे ‘महाज्योती’च्या माध्यमातून घवघवीत यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात गौरव

खंडाळा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त नायगाव (ता. खंडाळा) येथे आयोजित भव्य उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मैत्रेयीने ‘महाज्योती’ संस्थेच्या सहाय्याने मिळवलेले हे यश राज्यभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

महाज्योतीच्या योजनांमुळे यशस्वी वाटचाल

पुण्यात राहणाऱ्या मैत्रेयी जमदाडे हिने ‘महाज्योती’ संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेत कठोर मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत राज्यात अव्वल स्थान पटकावले. ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी’ (राजपत्रित) या पदासाठी राज्यभरातून निवड झालेल्या उमेदवारांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान तिला मिळाला.

स्मरणीय सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित महाज्योतीच्या योजनांचा लाभ घेत मैत्रेयीने मिळवलेले यश स्तुत्य आहे. समाजातील महिलांना सक्षम करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मैत्रेयीसारख्या मुली देशाला पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी आहेत.

”सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा

मैत्रेयीने तिच्या यशामागे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे मोठे योगदान असल्याचे नमूद केले. “महाज्योतीच्या मार्गदर्शनाने शिक्षण आणि प्रशिक्षणाचा प्रभावी उपयोग करणे शक्य झाले,” असे सांगत तिने संस्थेचे आभार मानले.

सत्कार सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास अनेक मान्यवर, मंत्री, अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. “महाज्योतीच्या योजनांमुळे अनेक तरुणांना प्रगतीचा मार्ग सापडत आहे. या संस्थेच्या कार्यामुळे मैत्रेयीसारख्या मुलींनी समाजात आपली ओळख निर्माण केली आहे,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात महाज्योतीच्या योजनांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर आणि महिला सक्षमीकरणासाठीच्या प्रयत्नांना चालना देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

error: Content is protected !!